रब्बीसाठी सिन्नरला १७ हजार हेक्टर पेरणीचे उद्दिष्ट; कांदा लागवडीखाली ८ हजार हेक्टर

सिन्नर (नाशिक) : तालुक्यात यंदाच्या रब्बी हंगामासाठी अत्यंत पोषक वातावरण आहे. कृषी विभागाच्या अहवालानुसार तालुक्यात १७ हजार १०१ पेरणीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. तर नियोजनानुसार त्यात वाढ होऊन २३ हजार २९८ हेक्टरवर पेरण्या होतील, असा अंदाज आहे. यंदाच्या हंगामात आठ हजार हेक्‍टरवर रब्बी कांदा लागवड होईल, असे कृषी विभागाच्या अहवालात म्हटले आहे. 

सिन्नरचे शेती अर्थकारण मुळातच खरिपावर अवलंबून असते. दोन वर्षांपासून पर्जन्यमानात वाढ होत असल्याने त्याचा अपेक्षित परिणाम रब्बी हंगामावर दिसू लागला आहे. यंदा विक्रमी पर्जन्यमान झाल्यामुळे रब्बीचा हंगाम आशादायी राहील, अशी परिस्थिती आहे. तालुक्यात १७ हजार १०९ हेक्टर क्षेत्रावर रब्बीसाठी पेरणी लक्षांक देण्यात आला असला तरी कृषी विभागाच्या नियोजनानुसार प्रत्यक्षात २३ हजार २९८ हेक्‍टर क्षेत्रावर पेरणी होण्याचा अंदाज आहे. नोव्हेंबरअखेर प्राप्त आकडेवारीनुसार तालुक्यात १३ हजार ९५१ हेक्टर क्षेत्रावर प्रत्यक्ष पेरणी झाली असून, महिनाभरात लक्षांकापेक्षा अधिक क्षेत्र लागवडीखाली येणार आहे. 

हेही वाचा > क्रूर नियती! तो' एक सेल्फीचा मोह अनावर; अन् माऊली लेकरांपासून दुरावली कायमची

रब्बी कांदा लागवडीखाली विक्रमी वाढ

रब्बी ज्वारी, गहू व मका ही प्रमुख तृणधान्य पिके या हंगामात घेतली जाणार असून, त्यांचे अंदाजे लागवड क्षेत्र १६ हजार ५२६ हेक्‍टर आहे. तर सहा हजार ७७२ हेक्टर क्षेत्रात हरभरा पीक उत्पादन घेतले जाईल. रब्बी कांदा लागवडीखाली यंदा विक्रमी वाढ अपेक्षित आहे. जवळपास सात हजार ९७४ हेक्टर क्षेत्र कांद्यासाठी वापरात येईल, असे कृषी विभागाच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे. सिन्नर कृषी मंडळ आठ हजार ४९९ हेक्टर, नांदूरशिंगोटे मंडळात चार हजार १२५ हेक्‍टर, तर वावी मंडळात दहा हजार ६७४ हेक्टर क्षेत्रात पेरणी होईल, असा अंदाज आहे. 

गेल्या वर्षीच्या तुलनेत पेरणी लक्षांकात चार हजार हेक्टरची वाढ या वेळी अपेक्षित आहे. ५ डिसेंबरला जागतिक मृदा दिनानिमित्त प्रत्येक ग्रामपंचायत स्तरावर कार्यक्रम घेऊन शेतकऱ्यांना माती परीक्षणाचे फायदे, याबाबत मार्गदर्शन करण्यात येईल. 
- अण्णासाहेब गागरे, तालुका कृषी अधिकारी 

हेही वाचा > नियतीची खेळी! लेकाला जेवण घेऊन माऊली आली शेतात; आणि घरी घडले भलतेच

दीर्घ प्रतीक्षेनंतर यंदा रब्बी हंगाम जोरात आहे. अशा वेळी शेतकऱ्यांना मुबलक खते व पुरेशा दाबाने वीजपुरवठा व्हावा. पुढील काळात थंडी वाढल्यानंतर शेतकऱ्यांना रात्रीच्या वेळी शेतात जाणे धोक्याचे राहील. त्यामुळे दिवसभरात किमान आठ तास सुरळीत व पुरेशा दाबाने वीजपुरवठा करणे आवश्यक आहे. 
- विजय काटे, माजी सरपंच, वावी