नाशिक : पुढारी वृत्तसेवा- कृषी विभागामार्फत रब्बी हंगाम 2023 पीक स्पर्धेचे (Crop Competition) आयोजन करण्यात आले असून, स्पर्धेत जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी दि. 31 डिसेंबर 2023 पर्यंत सहभाग नोंदवावा, असे आवाहन कृषी संचालक दिलीप झेंडे यांनी केले आहे.
पिकांची उत्पादकता वाढावी, शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेतीत नवनवीन प्रयोग करावे, प्रयोगशील शेतकऱ्यांना प्रोत्साहन मिळावे, वंचित / दुर्लक्षित तसेच पौष्टिक तृणधान्य पिकांच्या क्षेत्रात आणि उत्पादन तंत्रज्ञानात वाढ व्हावी आणि राज्याच्या एकूण उत्पादनात भर पडावी यासाठी कृषी विभागामार्फत पीक स्पर्धांचे आयोजन करण्यात येते. जास्तीत जास्त शेतकऱ्यांचा पीक स्पर्धांमध्ये सहभाग वाढण्याच्या दृष्टीने दि. 20 जुलै 2023 रोजीच्या शासन निर्णयाद्वारे रब्बी हंगाम पिकांच्या पीकस्पर्धा तालुका, जिल्हा व राज्यपातळीवर राबविण्यात येणार आहेत. त्यानुसार कृषी विभागामार्फत रब्बी हंगाम 2023 मध्ये सर्वसाधारण व आदिवासी गटासाठी ज्वारी, गहू, हरभरा, करडई व जवस या पाच पिकांसाठी स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे. (Crop Competition)
कोणती कागदपत्रे लागतील? (Crop Competition)
स्पर्धेत सहभागासाठी शेतकऱ्याकडे स्वत:च्या नावे जमीन व ती तो स्वत: कसत असणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांना एकाचवेळी एकापेक्षा जास्त पिकांसाठी स्पर्धेत सहभागी होता येईल. स्पर्धेत सहभागी शेतकऱ्याने स्वत:च्या शेतावर त्या पिकाखाली किमान 40 आर क्षेत्रावर सलग लागवड आवश्यक आहे. विहित नमुन्यातील अर्ज (प्रपत्र-अ), प्रवेश शुल्क चलन, जमिनीचा 7/12 व 8-अ उताऱ्याची प्रत, जात प्रमाणपत्र (आदिवासी असल्यास), पीकस्पर्धेसाठी शेतकऱ्याने संबंधित 7/12 वरील घोषित केलेल्या क्षेत्राचा चिन्हांकित केलेला नकाशा, बँक खाते चेक / पासबुकच्या पहिल्या पानाची छायांकित प्रत इत्यादी कागदपत्रे स्पर्धेत भाग घेणाऱ्या अर्ज करताना शेतकऱ्यांकडे असणे आवश्यक आहे.
अर्ज कसा कराल? कुणाशी साधाल संपर्क ?
पीकस्पर्धेबाबत अधिक माहितीसाठी शेतकरी बंधू-भगिनींनी संबंधित तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा किंवा महाराष्ट्र शासन कृषी विभागाचे संकेतस्थळ www.krishi.maharashtra.gov.in ला भेट द्यावी.
अशी आहेत बक्षिसे
तालुका पातळीवर प्रथम क्रमांकास 5 हजार, द्वितीय क्रमांकास 3 हजार व तृतीय क्रमांकास 2 हजार रुपये.
जिल्हा पातळीवर प्रथम क्रमांकास 10 हजार, द्वितीय 7 हजार व तृतीय 5 हजार रुपये.
राज्य पातळीवर प्रथम क्रमांकास 50 हजार, द्वितीय 40 हजार व तृतीय क्रमांकास 30 हजार रुपये असे स्वरूप आहे.
हेही वाचा :
- Pune News : खेड तहसील कार्यालयाबाहेरच मरण पत्करू
- मोठी बातमी : मागासवर्ग आयोगाच्या अध्यक्षांचा राजीनामा; नेमकं कारण काय?
- Lok Sabha Elections : नाशिकच्या आखाड्यात शिंदे- उबाठा गटांत सामना?
The post रब्बी हंगाम पीक स्पर्धेत सहभाग घ्या, 31 डिसेंबर पर्यंत करा अर्ज appeared first on पुढारी.