रशियातील मृत विद्यार्थ्यांची शव उद्या मुंबईत येणार

जळगाव; पुढारी वृत्तसेवा : रशियामध्ये नदीपात्रात बुडुन जळगाव जिल्ह्यातील तीन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला होता. या मयत विद्यार्थ्यांचे शव ताब्यात घेण्यासाठी प्राधिकृत अधिकारी म्हणून उपविभागीय अधिकारी, अमळनेर, उपविभागीय अधिकारी, पाचोरा याची नियुक्ती जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी केली आहे. मयत विद्यार्थ्यांचे शव हे दुबई मुंबई विमानतळावर उद्या (13) सायंकाळी ५.४५ वाजता पोहचणार आहेत. अशी माहिती भारतीय वाणिज्य दुतावास देवीचरण धुलीदास यांनी पत्रद्वारे दिली आहे.

रशियामध्ये जळगाव जिल्हयातील शिक्षण घेण्यासाठी गेलेल्या जिया फिरोज पिंजारी (वय २०) व जिशान अशफाक पिंजारी (वय २०, दोन्ही रा.अमळनेर) तसेच हर्षल अनंतराव देसले (वय १९, रा. भडगाव) हे तीनही विद्यार्थी ०४ जून रोजी वोल्खोव्ह नदीत बुडुन मृत्यू झाला होता. भारतीय वाणिज्य दुतावास देवीचरण धुलीदास यांनी दिलेल्या माहितीनुसार तीनही मयत विद्यार्थ्यांचे शव उद्या सायकाळी ५.४५ वाजता पोहचणार आहेत. तिनही विद्याध्यांचे शव मुंबई विमानतळवरून शासकीय प्रक्रियेनुसार ताब्यात घेवून विद्यार्थ्यांच्या नातेवाईकांकडे सोपवण्याची जबाबदारी जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण जळगाव आयुष प्रसाद यांनी महादेव खेडकर, उपविभागीय अधिकारी, अमळनेर भाग व भूषण अहिरे, उपविभागीय अधिकारी, पाचोरा यांना दिली आहे.