रसवंतिगृहांची किणकिण मंदावली! कोरोनाच्या भीतीने निम्मेच परप्रांतीय व्यावसायिक दाखल 

मालेगाव (जि.नाशिक) : उन्हाचा तडाखा वाढताच जिवाची काहिली भागविणारी रसवंतिगृहे जागोजागी थाटली जातात. जिल्ह्यासह कसमादेत परप्रांतीयांची शेकडो रसवंतिगृहे दर वर्षी थंडगार उसाच्या रसाची सेवा देतात.

उसाचा रस, लिंबू सरबत, लस्सीचा गोडवा पुरविण्यासाठी बिहार, उत्तर प्रदेशमधील कुटुंबे वर्षानुवर्षे या भागात व्यवसाय करीत आहेत. गेल्या वर्षी फेब्रुवारीच्या सुरवातीला सुरू झालेली रसवंतिगृहे कोरोनामुळे दीड महिन्यात बंद करावी लागली. या वर्षीही कोरोनाचे सावट कायम असल्याने फेब्रुवारीअखेर निम्मेच परप्रांतीय व्यावसायिक परिसरात दाखल झाले आहेत. 
परप्रांतीयांबरोबरच स्थानिकांनीही रसवंतिगृहे सुरू केली आहेत. कोरोनामुळे रसवंतिगृहांच्या घुंगरूंचा आवाज मंदावला आहे.

या वर्षी कोरोनाचे सावट कायम

महामार्गासह विविध रस्त्यांच्या कडेला तसेच मोठ्या गावांमध्ये रसवंतिगृहांचा उन्हाळ्यात बोलबाला असतो. यातही स्थानिकांएवढेच बिहार, उत्तर प्रदेशमधील परप्रांतीय व्यवसाय थाटतात. वर्षानुवर्षे फेब्रुवारी ते मे या चार महिन्यांसाठी ते या भागात येतात. सातत्याचे येणे असल्याने त्या-त्या भागातील नागरिकांशी त्यांचे घनिष्ट संबंध निर्माण झाले आहेत. चार ते पाच महिन्यांसाठी जागा भाड्याने घेतली जाते. बहुतेक व्यावसायिक याच ठिकाणी राहतात. जेवण तयार करण्याच्या भांड्यांसह जुजबी संसार तसेच रसवंतिगृहावरील यंत्र, खुर्च्या आदी साहित्य ते विश्‍वासाने कोणाकडे तरी ठेवून जातात. रोज १२ ते १४ तास व्यवसाय करत चार महिन्यांचा उदरनिर्वाह भागवून कमविलेल्या पैशातून ते जून-जुलैमध्ये सुरू होणाऱ्या खरीप हंगामासाठी गावी वापरतात. 
दर वर्षी फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात रसवंतिगृहे सुरू होतात. या वर्षी कोरोनाचे सावट कायम आहे. त्यामुळे अजून तरी निम्मेच परप्रांतीय व्यावसायिक या भागात दाखल झाले आहेत. उन्हाचा तडाखा जाणवू लागला आहे. मालेगावात पारा ३६.६ अंशापर्यंत वाढला आहे. त्यामुळे काही प्रमाणात रसवंतिगृहांवर गर्दी होत आहे. कोरोना रुग्णसंख्या वाढत असल्याने आगामी काळात लॉकडाउन होते की काय, या भीतीने या व्यावसायिकांना ग्रासले आहे. 

हेही वाचा  - ''पुजा चव्हाणच्या मोबाईलवर संजय राठोड यांचे 45 मिस्डकॉल''; चित्रा वाघ यांचा नाशिकच्या पत्रकार परिषदेत दावा

मुबलक ऊस तरीही, व्यावसायिक हतबल 

या वर्षी रसवंतिगृहांना मुबलक ऊस उपलब्ध आहे. सलग दोन वर्षे झालेल्या समाधानकारक पावसामुळे नाशिक जिल्ह्यासह खानदेशात उसाचे क्षेत्र वाढले आहे. उत्तर महाराष्ट्रात २२ पैकी केवळ आठ साखर कारखाने सुरू आहेत. त्यामुळे परिसरात रसवंतिगृहांसाठी सहज व माफक दरात ऊस उपलब्ध आहे. कोरोना नियंत्रणात आल्यास उसाची उपलब्धता असताना व्यवसाय जोमात होऊ शकतो. शिवाय या वर्षीदेखील ऐन उन्हाळ्यात मोठ्या प्रमाणावर लग्नसोहळे आहेत. त्यामुळे दमछाक होणाऱ्या वऱ्हाडींच्या जिवाची काहिली भागविण्याचे काम शेकडो रसवंतिगृहे करू शकतील. मात्र हा व्यवसाय पूर्णत: कोरोना परिस्थितीवर अवलंबून असल्याने रसवंतीचालक बॅकफूटवर आहेत. कोणीही मोठ्या प्रमाणावर उसाची खरेदी करत नाही. सध्यातरी गरजेपुरताच ऊस खरेदी केला जात आहे.  

 हेही वाचा - अवघ्या चारच दिवसांवर बहिणीचं लग्न अन् लग्नघरातूनच निघाली अंत्ययात्रा; दुर्दैवी घटना