रस्त्याचे एकाच वेळी दोन ठिकाणी भूमिपूजन! विकासकामांच्या श्रेयासाठी नगरसेवकांमध्ये चढाओढ

सिडको (जि.नाशिक) : नाशिक महापालिकेची पंचवार्षिक निवडणूक अवघ्या वर्षभरावर येऊन ठेपल्याने प्रभागातील नगरसेवकांच्या वतीने ठिकठिकाणी विविध विकासकामांचा धुमधडाका सुरू असल्याचे बघायला मिळत आहे. दरम्यान, भुजबळ फार्म ते हाजी चिकन सेंटर रस्त्याचा भूमिपूजन सोहळा एकाच वेळी दोन वेगवेगळ्या ठिकाणी पार पडल्याने प्रभागांतील नगरसेवकांच्या विकासकामांचा श्रेयवाद यानिमित्ताने उघड्यावर पडल्याची चर्चा परिसरातील नागरिकांमध्ये दिसून येत आहे. 

श्रेयवादाची लढाई उघड्यावर

प्रभाग २४ मधील भुजबळ फार्म ते हाजी चिकन सेंटर रस्त्याच्या काँक्रिटीकरण कामाचा भूमिपूजन सोहळा नागरिकांच्या उपस्थितीत सोमवारी (ता. २२) सायंकाळी पार पडला. भुजबळ फार्मजवळ शिवसेना महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर, माजी महापौर विनायक पांडे, युवासेना राज्य विस्तारक अजिंक्य चुंभळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक राजेंद्र महाले, शिवसेनेच्या नगरसेविका कल्पना चुंभळे व कल्पना पांडे यांच्या हस्ते, तर हाजी चिकन सेंटर या ठिकाणी शिवसेनेचे नगरसेवक प्रवीण तिदमे यांच्या हस्ते रस्त्याचा भूमिपूजन सोहळा नागरिकांच्या उपस्थितीत पार पडल्याचे दिसून आले. थोडक्यात काय, तर एकाच विकासकामांचे दोन वेगवेगळ्या ठिकाणी नगरसेवकांच्या हस्ते करण्यात आलेल्या भूमिपूजन कार्यक्रमामुळे निर्माण झालेल्या दोन गटांतील श्रेयवादाची लढाई यानिमित्ताने उघड्यावर पडल्याचे उपस्थित नागरिकांना दिसून आले. 

हेही वाचा - केवळ दैव बलवत्तर म्हणून बिबट्याच्या हल्ल्यातून वाचले बहिण-भाऊ; साक्षात मृत्यूच्या दाढेतून परतले

सदर रस्त्याच्या कामासाठी आम्ही (नगरसेविका कल्पना चुंभळे व कल्पना पांडे) तिघेही नगरसेवकांनी पत्रव्यवहार करून पाठपुरावा केला आहे. त्यामुळे या रस्त्याचे तीन वर्षांनंतर काम सुरू होत आहे. उगाच कोणी श्रेय घेण्याचे कारण नाही. 
-राजेंद्र महाले, नगरसेवक, राष्ट्रवादी काँग्रेस 

माझ्याशिवाय या कामासाठी कुणाचाही पत्रव्यवहार, पाठपुरावा नाही. तसेच, चार वर्षांत कुठलेही काम नाही. सामान्य कुटुंबातील व्यक्ती असून, जनतेचे कार्य व सेवा करून मोठा झालो आहे. त्यास पैशांचे बॅकग्राउंड नाही. दहा घरे फिरून आलेलो नाही. पदासाठी पैसे देऊन मी इच्छुक नाही. पक्षाशी प्रामाणिक आहे. परत नगरसेवक नाही झालो तरी चालेल; पण प्रामाणिक काम करतो व प्रामाणिक काम करत राहणार 
- प्रवीण तिदमे, नगरसेवक, शिवसेना 

 

हेही वाचा - रक्षेसाठी राखी बांधलेले हातच रक्ताने माखलेले! रक्षणकर्ता भाऊच बनला बहिणीसाठी काळ