रस्त्यावर कचरा करणे पडले महागात; आरोग्य विभागाकडून ८३ जणांवर कारवाई

नाशिक : पूर्व विभागाच्या आरोग्य विभागाकडून विविध प्रकारच्या कारवायांत एक लाख सात हजार २४० रुपयांचा दंड वसूल केला आहे, तर १११ जणांवर कारवाई करण्यात आली आहे. त्यात सर्वाधिक कचरा निर्माण करणाऱ्या ८३ जणांवर कारवाई करण्यात आली. 

८३ जणांवर कारवाई
स्वच्छ सर्वेक्षण अभियानांतर्गत रस्त्यावर कचरा करणे, उघड्यावर कचरा फेकणे, उघड्यावर लघुशंका करणे, थुंकणे, कचरा विलगीकरण न करणे, मोकळ्या भूखंडावर कचरा टाकणे, मास्कचा वापर न करणे. अशा विविध प्रकारच्या कारवाया करून दंड वसूल करण्याचा पूर्व विभागाच्या आरोग्य विभागाकडून धडाका लावला आहे. विभागीय स्वच्छता निरीक्षक सुनील शिरसाट यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य विभागाच्या पथकाने २५ जानेवारीपर्यंत १११ जणांवर दंडात्मक कारवाई करत एक लाख सात हजार २४० रुपयांचा दंड वसूल केला आहे.

हेही वाचा > हॉटेल मालकाने बळजबरीने ग्राहकाकडून घेतला ८० हजारांचा ऐवज; मालकावर गुन्हा दाखल

आरोग्य विभागाकडून धडाका

त्यात घरगुती आणि व्यावसायिक आस्थापनांत कचरा निर्माण करणाऱ्यांवर सर्वाधिक ८३ जणांवर कारवाई केली. त्यांच्याकडून २५ हजार ९०० रुपयांचा दंड वसूल केला. त्यापाठोपाठ रस्ते मार्गावर कचरा टाकणे, तसेच प्रतिबंधक प्लॅस्टिकचा वापर करणाऱ्या प्रत्येकी चार अशा आठ जणांवर कारवाई करत ४० हजारांचा दंड वसूल केला आहे. सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्या एकावर कारवाई करत एक हजारांचा दंड वसूल केल्याच्या कारवाईचाही यात समावेश आहे. 

हेही वाचा > सिनेस्टाइल पाठलाग! खंडणीची मागणी करणारा पोलीसांकडून ट्रेस; पोलिसांत गुन्हा दाखल

अशी झाली कारवाई 
दंडाचा प्रकार केसेस दंड 
पालापाचोळा, रबर, प्लॅस्टिक कचरा जाळणे २ १०,००० 
सर्व प्रकारचा कचरा मोठ्या प्रमाणावर जाळणे १ १०,००० 
सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणे ३ २०,००० 
रस्ते, मार्गावर कचरा टाकणे ४ ५,५४० 
सार्वजनिक ठिकाणी थुंकणे १ १,००० 
उघड्यावर लघुशंका करणे ३ ६०० 
घरगुती, व्यावसायिकांकडून कचरा निर्माण करणे ८३ २५,९०० 
प्रतिबंध प्लॅस्टिक वापर ४ २०,००० 
वेस्ट सर्व्हिस चार्जेस ५ ८,४०० 
मोकळ्या भूखंडावर मलबा टाकणे १ ५,००० 
मास्क न वापरणे ४ ८०० 
एकूण १११ १,०७,२४०