रस्त्यावर मोठमोठे ट्रेलर; रस्ते वाहतुकीसाठी की पार्किंगसाठी? 

सिडको (नाशिक) : राजेंद्र शेळके

अंबड लिंकरोड, चुंचाळे, दत्तनगर, अंबड रस्त्यावर मोठमोठे ट्रेलर रस्त्यावर दोन्ही बाजूने उभे राहात असल्याने कामगार व नागरिकांना ये-जा करण्यास मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागतो, असा आरोप नागरिकांनी केला आहे. रस्ते वाहतुकीसाठी की पार्किंगसाठी? असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केलेला आहे.

एक्सलो पॉइंटकडून चुंचाळे गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावर दोन्ही बाजूने अवजड ट्रेलर उभे केले जातात. या रस्त्याने दररोज हजारो नागरिक, वाहनचालक ये-जा करतात. बेजबाबदारपणे ट्रेलर उभे केल्यामुळे वाहतुकीस अडथळे निर्माण होतात. त्यामुळे दुचाकी वाहनांच्या अपघातांच्याही घटना घडत आहेत. यावर वाहतूक पोलिस व महापालिकेने करवाई करावी, अशी मागणी नागरिक व कामगार वर्ग करीत आहे. अंबड लिंकरोड भागात कंटेनर अथवा ट्रक हे रस्त्यालगत पार्किंग करतात. त्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होतो. कित्येकदा अपघातही होतात.

पादचारी पथ की पार्किंगचे ठिकाण?

रस्त्याच्या दोन्ही बाजूने पादचारी पथ असतो. नागरिकांना ये – जा करण्यासाठी हा मार्ग आहे, असा नियम आहे. मात्र या भागात पादचारी पथ नसून, रस्त्याच्या दोन्ही बाजूंच्या जागा ट्रेलर पार्किंगसाठी वापरल्या जात आहेत. यावर प्रशासनाने कारवाई करावी, अशी मागणी रहिवाशांनी केली आहे.

अंबड लिंकरोड, चुंचाळे, दत्तनगर, अंबड रस्त्यावर या ठिकाणी रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी मोठी वाहने उभी केली जातात. रस्ता म्हणजे पार्किंगचे ठिकाण झाले असून, त्यामुळे वाहतूक कोंडी आणि अपघात हे नित्याचेच झालेले आहेत. – शरद फडोळ, सामाजिक कार्यकर्ते, अंबड.

अंबड औद्योगिक वसाहतीत ट्रक टर्मिनसची आवश्यकता आहे. ट्रक टर्मिनस झाल्यास मोठे ट्रक व कंटेनर पार्किंगची व्यवस्था होईल. ट्रक टर्मिनस करण्यासाठी आम्ही शासनाकडे पाठपुरावा केला आहे. -राजेंद्र फड, अध्यक्ष, नाशिक जिल्हा ट्रान्स्पोर्ट असोसिएशन

अंबड औद्योगिक वसाहतीत कंपनीने ट्रक पार्किंगची व्यवस्था करायला पाहिजे. तसेच कंपनीने कंटेनर अथवा ट्रक ड्रायव्हरला सुविधा उपलब्ध करून दिल्या पाहिजेत. -अमोल शेळके, शहराध्यक्ष, भाजप वाहतूक आघाडी

शहराच्या बाहेर ट्रक पार्किंगसाठी व्यवस्था केली पाहीजे. औदयोगिक वसाहतीत दुपारी वाहनांची वर्दळ नसते. औद्योगिक वसाहतीत दुपारी १२ ते ४ या वेळेत कंटेनर व ट्रकने वाहतुक केली पाहिजे. -ललीत बूब, अध्यक्ष, आयमा.

हेही वाचा: