राख सावडण्याची परंपरा मोडीत! स्मशानभूमीत मृतदेह वाढल्याचा परिणाम; तीन तासात अस्थी उचलण्याचे बंधन 

नाशिक : कोविडमुळे मृत्यूच्या प्रमाणात वाढ झाल्याने शहरातील स्मशानभूमीमध्ये मृत शरीरे जाळण्यासाठी बेड उपलब्ध होत नाही. त्यामुळे जमिनीवर सरण रचून मृतदेह जाळले जात आहेत. एकदा मृतदेह जाळल्यानंतर तीन ते चार तासात एका नातेवाईकाने राखेतून अस्थी गोळा केल्यास ठीक त्यानंतर पाण्याचे फवारे मारून दुसरा मृतदेहासाठी जागा स्वच्छ केली जात असल्याने राख सावडण्याची परंपरा मोडीत निघाली आहे. 

शहरात कोरोना संसर्गाचा वेग वाढत असताना मृतांच्या संख्येतही वाढ होत आहे. गेल्या वर्षभरात शहरात १२३५ नागरिक कोरोनामुळे मृत झाले आहे. फेब्रुवारीपासून मृतांच्या संख्येत वाढ झाली आहे. नाशिक व पंचवटी अमरधामसह मोरवाडी, देवळाली गाव, विहीतगाव, पाथर्डी, टाकळी, नांदूर-मानूर, दसक या भागात मृतांवर अंत्यसंस्कार केले जात आहेत. नाशिक अमरधाममध्ये विद्युत व गॅस शवदाहिनीवरील ताण वाढल्याने मृतदेह वेटिंगला राहू नये म्हणून लाकडावर अंत्यसंस्कार करण्यास परवानगी देण्यात आली. तरीही मृतदेहांची गर्दी कमी होत नाही. कोविडमुळे मृत्यू झाल्यास पीपीई किटमध्ये गुंडाळलेला मृतदेह शववाहिनीमधून थेट स्मशानभूमीत आणला जातो. ठराविक नातेवाइकांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार केले जातात. मृतदेह जाळल्यानंतर साधारण दहा ते बारा तासात अग्निशांत होतो. त्यानंतर अस्थी गोळा करून दशक्रिया विधीला विसर्जन करण्याची परंपरा आहे. मात्र स्मशानभूमीत मृतदेह वेटिंगला असल्याने अग्निडाग दिल्यानंतर तीन तासांमध्ये एखाद्या नातेवाईकाने येऊन अस्थी गोळा करण्याचे आवाहन केले जाते. नातेवाईक वेळेत न आल्यास अग्निसंस्कार केलेली जागा पाण्याच्या फवाऱ्याने धुवून टाकली जात आहे. त्यामुळे कोरोनामुळे राख सावडण्याची परंपरा मोडीत निघताना दिसत आहे. 

हेही वाचा - अवघे गाव हळहळले; दोन दिवसांपूर्वीच्या लेकीच्या लग्नाच्या मांडवातूनच निघाली पित्याची अंत्ययात्रा  

दशक्रिया विधीसाठी गर्दी 

रामकुंडावर एरवीही दिवसाला दहा दशक्रिया विधी व्हायचे, परंतु नाशिकसह राज्यातील अन्य भागातूनही नागरिक दशक्रिया विधीसाठी दाखल होत असल्याने दशक्रिया विधी शेडमध्ये नातेवाइकांची गर्दी होत असल्याने हा भाग कोरोना स्प्रेडर्स ठरण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. कमीत-कमी लोकांमध्ये दहाव्याच कार्यक्रम करायचा ठरला तरी दररोज तीस ते चाळीस दहावे होत असल्याने व एका दहाव्यासाठी किमान दहा ते पंधरा लोक हजर होत असल्याने किमान चारशे ते पाचशे लोक दररोज सकाळी रामकुंड परिसरात जमलेले पाहायला मिळत आहे. 

हेही वाचा - लग्नाच्या तयारीला लागलेल्या वधू-वरांचा हिरमोड! विसंगत आदेशामुळे 'वेडिंग इंडस्ट्री'त गोंधळ