नाशिक : पुढारी वृत्तसेवा – लोकसभा निवडणूक जाहीर झाल्याबरोबरच प्रशासनाने आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणी करण्यास सुरुवात केली आहे. जिल्हाभरातील राजकीय पक्षांचे होर्डिंग्ज काही क्षणात उतरविले असून, पक्षांचे चिन्ह, शाखाफलक, कोनशिला झाकण्यास सुरुवात केली आहे. मात्र, बऱ्याच राजकीय पक्षांकडून प्रशासनाची दिशाभूल केली जात असून, शहरातील उच्चभ्रू वसाहतींमधील इमारतींच्या भिंतींवर पक्षाची जाहिरात होईल, अशी पेंटिंग्ज काढलेली आहेत.
आदर्श आचारसंहिता लागू झाल्यानंतर पुढील ७२ तासांत प्रशासनाकडून राजकीय पक्षाची जाहिरात होईल, अशा स्वरूपाचे होर्डिंग्ज काढण्यासह इतर बाबी झाकल्या जातात. महापालिका प्रशासनाकडून गेल्या तीन दिवसांपासून शहरातील सहाही विभागांत यासाठी कारवाई केली जात आहे. मात्र, राजकारण्यांनी मतदारांना आकर्षित करण्यासाठी चक्क भिंती रंगविल्या आहेत. या पेंटिंग्जमध्ये ‘पक्षाचे नाव, चिन्ह व प्रचंड मतांनी विजयी करावे’ अशा स्वरूपाचा मजकूर आहे. या जाहिराती आदर्श आचारसंहितेचा भंग करणाऱ्या असून, प्रशासनाने त्यावर तत्काळ कारवाई करण्याची गरज असल्याचे मत नागरिकांकडून व्यक्त केले जात आहे. दरम्यान, अद्यापपर्यंत महाविकास आघाडी, महायुतीमध्ये जागा वाटपाचे घोंगडे अजूनही भिजत असून, नाशिक लोकसभा मतदारसंघातील चित्र अद्यापही धूसर आहे. मात्र, राजकीय पक्षांसह इच्छुकांनी गाफील न राहता, अशा स्वरूपाच्या छुप्या प्रचाराची एक संधीही सोडली नसल्याचे दिसून येत आहे.
प्रशासनास कळवा
महापालिका प्रशासनाकडून शहराच्या चारही भागांत आचारसंहितेची अंमलबजावणी करण्यासाठी कारवाई केली जात आहे. मात्र, गल्लोगल्ली अशा स्वरूपाच्या जाहिराती केल्या जात असल्याने, ही बाब प्रशासनाच्या नजरेआड होत आहे. अशात परिसरातील सतर्क नागरिकांनी महापालिका प्रशासनाशी संपर्क साधून याबाबतची माहिती द्यावी, असे आवाहन मनपा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
हेही वाचा –
- Leopard News : शिरूरच्या पूर्व भागात पुन्हा बिबट्याची दहशत!
- स्थानिक माठ कारागिरांच्या धगधगत्या आव्याला घरघर; परप्रांतीय बनावटीच्या माठांना पसंती
- Badaun Double Murder | उधार मागण्याच्या निमित्ताने आला आणि २ मुलांचा गळा चिरला : बदायूं प्रकरणात नेमकं काय घडलं?
The post राजकीय पक्षांकडून आचारसंहितेची ऐशीतैशी, प्रशासनाचे दुर्लक्ष appeared first on पुढारी.