Site icon

राजाचा मुलगा राजा होणार नाही…,शुभांगी पाटील यांनी फडकवलं बंडाचं निशाण

धुळे : पुढारी वृत्तसेवा

राजकीय डावपेच करून नाशिक पदवीधर मतदार संघाची जागा जिंकून घेण्याच्या भाजपाच्या प्रयत्नांना आता शिवसेनेने ब्रेक लावला आहे. ऐनवेळी आमदार सुधीर तांबे यांनी काँग्रेसचा एबी फॉर्म मिळून देखील घुमजाव केल्यानंतर अडचणीत आलेल्या महाविकास आघाडीच्या घटकपक्ष असणाऱ्या शिवसेनेने आता धुळ्याच्या शुभांगी पाटील यांना या निवडणुकीसाठी आपला पाठिंबा दर्शवला आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा पाठिंबा मिळवण्यासाठी देखील हालचाली सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. दरम्यान राजाचा मुलगा आता राजा होणार नाही, तर ज्याच्या अंगी गुण आहे त्यालाच जनता संधी देईल, असा टोला त्यांनी भाजपाला लगावला आहे.

नाशिक विभागीय पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीसाठी आता हालचाली वेगवान झाल्या आहेत. या निवडणुकीसाठी काँग्रेसने अधिकृतपणे आमदार सुधीर तांबे यांना एबी फॉर्म दिला होता. मात्र ऐनवेळी उमेदवारी भरण्याच्या शेवटच्या क्षणाला आमदार सुधीर तांबे यांच्या ऐवजी त्यांचा मुलगा सत्यजित तांबे यांनी अपक्ष उमेदवारी करून काँग्रेसला झटका दिला. काही दिवसांपूर्वीच एका पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमांमध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्याच मंचावर उपस्थित असणारे संगमनेरचे आमदार तथा माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नावाने वाक्य वापरत असताना नेतृत्व गुण असणाऱ्या सत्यजित यांना फार काळ बाहेर बसवणे ठीक नाही. चांगल्या माणसाला संधी दिली पाहिजे अशा चांगल्या माणसांकडे भारतीय जनता पार्टीचे लक्ष असते. असा टोला लगावून एक प्रकारे या मतदारसंघात राजकीय खेळी करणार असल्याचे संकेत उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले होते. त्याचा प्रत्यय आता सत्यजित तांबे यांनी अपक्ष उमेदवारी दाखल करून दिसून येतो आहे.

दरम्यान या राजकीय खेळीमध्ये महाविकास आघाडीला झटका मिळालेला असताना आता शिवसेनेने भारतीय जनता पार्टीच्या या मनसुभेला ब्रेक लावला आहे. धुळ्याच्या रहिवासी असणाऱ्या तसेच जळगाव, नंदुरबार, अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्यात नातेवाईक आणि प्रत्यक्ष शिक्षकांबरोबर असणारा संपर्क पाहून पदवीधरसाठी उमेदवारी करणाऱ्या शुभांगी पाटील यांना शिवसेनेने आपला पाठिंबा दर्शवला आहे. मुंबई येथे शिवसेनेच्या बिनीच्या शिलेदारांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीनंतर शुभांगी पाटील यांनी शिवसेनेने त्यांना पाठिंबा दिला असल्याचे जाहीर केले. यावेळी त्यांनी राजाचाच मुलगा राजा होणार नाही, तर काम करणाऱ्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला जनता संधी देईल, असा टोला भारतीय जनता पार्टीला लगावत असतानाच वंशपरंपरेवर देखील टीका केली आहे.

काही महिन्यांपूर्वीच शुभांगी पाटील यांनी भारतीय जनता पार्टी प्रवेश केला होता. त्यामुळे भारतीय जनता पार्टी त्यांना या निवडणुकीसाठी एबी फॉर्म देईल अशी अटकळ होती. मात्र ऐन वेळेस भारतीय जनता पार्टीने त्यांना देखील सबुरीचा सल्ला दिल्याचे दिसते आहे. या भारतीय जनता पार्टीच्या खेळीला प्रत्युत्तर देण्यासाठीच शुभांगी पाटील यांनी शिवसेनेच्या शिलेदारांसमवेत बैठक घेऊन आपली उमेदवारी सक्षम केल्याचे चित्र आहे. आता काँग्रेसचे नेते नाना पटोले यांच्यासमवेत बैठक घेऊन ते काँग्रेसचा तर राष्ट्रवादीच्या नेत्यांशी चर्चा करून राष्ट्रवादीचा देखील पाठिंबा मिळवण्याच्या तयारीत आहे.

The post राजाचा मुलगा राजा होणार नाही...,शुभांगी पाटील यांनी फडकवलं बंडाचं निशाण appeared first on पुढारी.

Exit mobile version