राजाश्रयाने धर्माचा, तर धर्माश्रयाने जीवनाचा उद्धार – श्री श्री रविशंकर

श्री श्री रविशंकर.www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

देशातील केदारनाथ, महाकाल यासारख्या मंदिरांकडे कोणी जात नव्हते, परंतु नरेंद्र मोदी सरकारने या मंदिरांचा उद्धार केला. भव्य राममंदिराचे निर्माण करून चांगले कार्य केले. नाशिकच्या धार्मिक क्षेत्राचाही कायापालट केल्याचे दिसून येत आहे. एकंदरीत राजाश्रयाने धर्म बनतो, तर देवाश्रयाने जीवनाचा उद्धार होतो, असे प्रतिपादन गुरुदेव श्री श्री रविशंकर यांनी केले.

ठक्कर डोम मैदानावर आयोजित महासत्संग व सामूहिक श्रीराम पठण या ज्ञानगंगा कार्यक्रमात हजारोंच्या संख्येने उपस्थित अनुयायांसमोर ते बोलत होते. यावेळी श्री श्री रविशंकर म्हणाले की, आत्मबल वाढविण्यासाठी जीवनात पुढे जा, काही करण्यासाठी उमंग, ऊर्जा जागरूकता असायला हवी. आत्मबल वाढवणे म्हणजेच ध्यान, बळ आणि ज्ञान वाढविणे होय. दररोज ज्ञानाच्या गोष्टी ऐकायला हव्यात. जीवन नश्वर आहे, बघता बघता आयुष्य संपून जाईल. विश्व सत्याचा एक अंश आहे, पूर्ण सत्य नाही. 2022 मध्ये ज्या शास्त्रज्ञांना नोबेल पारितोषिक प्राप्त झाले, त्यांनी लावलेला शोध आश्चर्यचकित करणाराच म्हणावा लागेल. त्यांच्या मते, जे आपण बघतो, ऐकतो ते सत्य नाही, या पद्धतीने जे दिसते ते खरं नाही. त्यामुळे आयुष्याला स्फूर्तिदायक बनवण्यासाठी वेदांत बनायला हवे, आयुष्यात असे सुख मिळावे, ज्याला दुःखाचा गंध नाही, अशी शांती मिळावी जी भंग होणार नाही. हे सगळं तेव्हाच होईल जेव्हा आपण आयुष्यात ज्ञान मिळवू, असेही ते म्हणाले.

दरम्यान, याप्रसंगी हजारोंच्या संख्येने नाशिककर उपस्थित होते. यावेळी श्री श्री रविशंकर यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वांनी सामूहिक श्रीरामरक्षा पठण केले.

नाशिकचे रस्ते उत्तम

श्री श्री रविशंकर यांनी नाशिकच्या विकासाबाबत बोलताना म्हटले की, येथील रस्ते उत्तम आहेत. गोदाघाटाचे सुरू असलेले कामही कौतुकास्पद असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

हेही वाचा :

The post राजाश्रयाने धर्माचा, तर धर्माश्रयाने जीवनाचा उद्धार - श्री श्री रविशंकर appeared first on पुढारी.