नाशिक : पुढारी वृत्तसेवा-राज्यपाल रमेश बैस हे मंगळवारी (दि.२१) तालुक्यातील कुशेगाव आणि मोडाळे गावांच्या दाैऱ्यावर येत आहेत. यावेळी ते शासकीय योजनांचा आढावा घेणार असून, शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत. राज्यपालांच्या दौऱ्यासाठी यंत्रणांनी जय्यत तयारी केली आहे.
जिल्ह्यात विकसित भारत यात्रेचा १५ नोव्हेंबरला शुभारंभ झाला आहे. या अनुषंगाने राज्यपाल बैस हे जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. राज्यपालांचे सकाळी ११ ला कुशेगाव येथील हॅलिपॅडवर आगमन होईल. याठिकाणी ते नॅनो युरियाचे प्रात्यक्षिक, शेतकऱ्यांशी संवाद साधणार असून, विद्यार्थ्यांना सायकल वाटप केले जाणार आहे. तेथून सकाळी ११ वाजून ४० मिनिटांनी बैस यांंचे मोडाळे गावी आगमन होईल. तेथे आदिवासी नृत्याद्वारे त्यांचे स्वागत केले जाणार आहे. तेथे शासकीय योजनांच्या लाभार्थींना विविध लाभांचे वाटप राज्यपाल यांच्या हस्ते करण्यात येईल. तसेच कार्यक्रमस्थळावरील आदिवासी विकास विभागाच्या योजना, कृषी योजना, क्रीडाविषयक योजना, पी. एम. विश्वकर्मा योजना, पी. एम. मुद्रा योजना, आयुष्मान भारत योजना, पंतप्रधान आवास योजना, उज्ज्वला योजना अशा विविध कल्याणकारी योजनांचे स्टॉल्सला बैस भेट देत माहिती जाणून घेणार आहेत.
राज्यपालांच्या दौऱ्यावेळी पालकमंत्री दादा भुसे, विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, खासदार हेमंत गोडसे, आमदार हिरामण खोसकर, विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, नाशिक परिक्षेत्राचे विशेष महानिरीक्षक बी. जी. शेखर पाटील आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. दौऱ्याच्या यशस्वीतेसाठी जिल्हाधिकारी जलज शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली विविध यंत्रणांनी तयारी पूर्ण केली आहे.
हेही वाचा :
The post राज्यपाल आज नाशिक जिल्हा दौऱ्यावर appeared first on पुढारी.