राज्यातील आमदारांना प्रत्येकी 80 लाखांची दिवाळी भेट

निधी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
राज्यातील सर्व आमदारांना स्थानिक विकास निधीतून प्रत्येकी 80 लाख रुपये देण्याचा शासन निर्णय जाहीर झाला आहे. शासनाच्या या दिवाळी भेटीमुळे राज्यातील 287 विधानसभा सदस्य आणि 63 विधान परिषद सदस्यांना आपापल्या मतदारसंघांत विकासकामे करण्यासाठी हा महत्त्वाचा निर्णय ठरणार आहे. दरम्यान, नाशिक जिल्ह्यात 15 विधानसभा सदस्य आणि 2 विधान परिषद सदस्य आहेत. त्यानुसार जिल्ह्याला 80 लाख रुपये प्रत्येकी असा विचार करता, एकूण 13 कोटी 60 लाख रुपये विकासकामांसाठी मिळणार आहे.

राज्यात सत्तांतर झाल्यानंतर मागील चार महिन्यांपासून सर्व कामांना स्थगिती देण्यात आली आहे. जिल्हा वार्षिक योजनांवरील स्थगिती उठविली असली, तरी अद्याप त्याचे नियोजन झालेले नाही तसेच एप्रिल 2021 नंतर मंजूर केलेल्या निधीवरील स्थगिती कायम आहे. त्यातच काही दिवसांपूर्वी ग्रामविकास मंत्रालयाने मूलभूत सुविधांसाठी मंजूर केलेल्या व कार्यारंभ आदेश न दिलेल्या सर्व कामांच्या मे – जून – ऑगस्टपर्यंतच्या निधीचे वितरण यापूर्वी सरकारने केले आहे. दिवाळीच्या काळातच सप्टेंबर व ऑक्टोबर या दोन महिन्यांचा निधी वितरित करण्यात आला आहे. प्रत्येक आमदाराला 80 लाख रुपये निधी वितरित करण्यात आला आहे.

राज्याच्या तिजोरीवर 1,464 कोटींचा बोजा
शासनाच्या या दिवाळी भेटीमुळे राज्याच्या तिजोरीवर 1,464 कोटी रुपयांचा बोजा पडणार आहे. मात्र, एवढ्या मोठ्या निधीचा बोजा एकाच वेळी पडू नये, यासाठी दर महिन्याला 10 टक्के निधी वितरित करण्याचे ठरविण्यात आले आहे.

हेही वाचा :

The post राज्यातील आमदारांना प्रत्येकी 80 लाखांची दिवाळी भेट appeared first on पुढारी.