राज्यात धान खरेदीत दोन लाख क्विंटलची घट; २४२ केंद्रात ३२ लाख धान खरेदी 

नाशिक : कोरोना, पावसाळी पट्ट्यात कमी झालेला पाऊस आणि हमीभावापेक्षा अधिक दर मिळाल्याने गेल्या वर्षीच्या तुलनेत आदिवासी विकास महामंडळाच्या आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत यंदाच्या आर्थिक वर्षात धान खरेदीत सुमारे दोन लाख क्विंटल घट झाली आहे. 

राज्यात आदिवासी विकास महामंडळांतर्गत नागपूर, अमरावती, औरंगाबाद, कोकण आणि नाशिक विभागांमधील २४२ आधारभूत खरेदी केंद्र चालविले जातात. आधारभूत खरेदी योजनेंतर्गत या केंद्रावर धान (भात) खरेदी केली जात असते. गेल्या वर्षी या केंद्रांच्या माध्यामतून एक हजार ८६८ हमीभावानुसार राज्यातील एक लाख १३ हजार ८४२ शेतकऱ्यांकडून ३४ लाख ७३ हजार ६१६ क्विंटल धान खरेदी करण्यात आली होती. मात्र, गेल्या वर्षी कोरोनाचे संकट, त्यातच पर्जन्यमान क्षेत्रात कमी-अधिक प्रमाणात झालेला पाऊस, तसेच व्यापाऱ्यांकडून हमीभावापेक्षा मिळालेला अधिकचा भाव यामुळे या वर्षी सुमारे दोन लाख क्विंटलची घट झाली आहे. चालू आर्थिक वर्षात एक लाख १८ हजार ७६८ शेतकऱ्यांकडून ३२ लाख ८४ हजार ५७१ क्विंटल धान खरेदी करण्यात आलेली आहे. त्या मोबादल्यात शेतकऱ्यांना सुमारे ६१३ कोटी रुपयेदेखील अदा केलेले आहेत. 

 हेही वाचा - स्‍वयंपाकगृह ते थेट 'CA'! गिरणी व्‍यावसायिकाच्या लेकीची उत्तुंग भरारी

नागपूर विभागात सर्वाधिक खरेदी 
या वर्षी नागपूर विभागात सर्वाधिक २६ लाख १७ हजार ८२६ रुपये धान खरेदी करण्यात आली. त्यापाठोपाठ कोकण विभागात ५ लाख ७१ हजार २१५ तर नाशिक विभागात ८७ हजार ५६ क्विंटल धान खरेदी झाली.  

हेही वाचा - दशक्रियाची विधी पडली महागात! वारंवार सांगूनही नियमांची एैशीतैशी; परिसरात खळबळ