राज्यात यंदा रब्बी क्षेत्रामध्ये १४ टक्क्यांनी वाढ; २२ लाख ३३ हजार हेक्टरवर पेरणी

नाशिक : राज्यात वरुणराजाने केलेल्या मेहेरबानीचे चांगले परिणाम रब्बी हंगामात दिसून येताहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत आतापर्यंत रब्बीच्या क्षेत्रात १४ टक्क्यांनी वाढ झाली आहे. ५१ लाख २० हजार हेक्टरपैकी गेल्या वर्षी नोव्हेंबरच्या तिसऱ्या आठवड्यात १५ लाख २० हजार हेक्टरवर रब्बीची पेरणी उरकली होती. यंदा आतापर्यंत २२ लाख ३३ हजार हेक्टरवर रब्बीच्या पेरण्या झाल्या आहेत. यंदा रब्बीचे पेरणी क्षेत्र ४३.६२ टक्क्यांपर्यंत पोचले आहे.

रब्बीच्या झालेल्या पेरणीची टक्केवारी

रब्बी ज्वारीचे क्षेत्र गेल्या वर्षीच्या तुलनेत एक लाख हेक्टरने वाढले आहे. मक्याची लागवड ३९ हजार हेक्टरने अधिक झाली आहे. हरभरा लागवडीखालील क्षेत्र आठ लाख ३८ हजार हेक्टरच्यापुढे गेले असून, ते गेल्या वर्षीच्या तुलनेत चार लाख ७७ हजार हेक्टरहून अधिक आहे. शिवाय करडई, जवस, तीळ, सूर्यफूल क्षेत्रात वाढ झाली आहे. विभागनिहाय या आठवड्याच्या सुरवातीपर्यंत रब्बीच्या झालेल्या पेरणीची टक्केवारी अशी ः कोकण- २१.५९, नाशिक- १८.३०, पुणे- ४२.४२, कोल्हापूर- ५८.४०, औरंगाबाद- ६३.८२, लातूर- ४९.१८, अमरावती- ४०.५४, नागपूर- २०.२७.

वाचलेल्या खरीप पिकांची स्थिती

अवकाळी पावसाच्या तडाख्यातून वाचलेल्या खरीप हंगामातील राज्यामधील भात व नाचणीची पिके पक्वतेच्या अवस्थेत आहे. पिकांची काढणी सुरू आहे. ज्वारीची काढणी पूर्णत्वाकडे गेली आहे. कापसाला बोंडे लागण्यापासून ती पक्वतेच्या अवस्थेत असून, वेचणी सुरू झाली आहे. तूर फुलोरा ते शेंगा व शेंगा पक्वतेच्या अवस्थेत आहेत. राज्यात काही ठिकाणी कापसावर अमेरिकन बोंडअळी, गुलाबी बोंडअळी, रस शोषणाऱ्या किडीचा प्रादुर्भाव जाणवत आहे. मक्यावर लष्करी अळीचा, तर तुरीवर घाटे अळी आणि पाने गुंडाळणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव झाला आहे.

हेही वाचा > दुर्देवी! वडिलांनाच पाहावा लागला पोटच्या मुलाच्या मृत्यूचा थरार; पायाखालची जमीनच सरकली

४१ लाख हेक्टरचे नुकसान

जून ते ऑक्टोबरदरम्यान राज्यात झालेली अतिवृष्टी, पुरामुळे ३४ जिल्ह्यांतील नुकसानीचा अहवाल कृषी विभागाने ५ नोव्हेंबरला तयार केला आहे. त्यानुसार ४१ लाख ४१ हजार २२१ हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले आहे. त्यात पिकांच्या जोडीला फळबागांचा समावेश आहे.

हेही वाचा > आडगावला व्यापाऱ्याला पाच लाखांचा गंडा! ११० क्विंटल लोखंडाच्या मालाचा अपहार