राज्यात लवकरच लव्ह जिहाद, धर्मांतर विरोधी कायदा आणणार : आमदार नितेश राणे

आमदार नितेश राणे.www.pudhari.news

चांदवड (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा

उत्तर प्रदेश, गुजरात व कर्नाटक राज्याने लागू केलेल्या लव्ह जिहाद, धर्मांतरविरोधी कायद्याचा अभ्यास राज्य सरकारतर्फे केला जात आहे. त्यानुसार येत्या अधिवेशनापर्यंत राज्यात अतिशय कडक व मजबूत लव्ह जिहाद तसेच धर्मांतरविरोधी कायदा तयार केला जाणार आहे. यासाठी हिंदुत्व विचारसरणीचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार हे प्रयत्नशील असल्याचे भाजपचे आमदार नितेश राणे यांनी चांदवडला पत्रकार परिषदेत सांगितले.

चांदवडला आयोजित सकल हिंदू समाजबांधवांच्या जनआक्रोश मोर्चात आमदार नितेश राणे सहभागी झाले होते. यावेळी त्यांनी हिंदूंवरील अत्याचाराचा निषेध करीत हिंदूंवरील अन्याय यापुढे खपवून घेतला जाणार नाही. जे कोणी पोलिस अधिकारी चुकीच्या पद्धतीने हिंदूंवर कारवाई करीत असतील त्यांच्यावरदेखील कडक कारवाई केली जाईल. हिंदू राष्ट्रात राहत असलेल्या हिंदूंना जर कोणी त्रास देत असेल तर अशा जिहादी विचाराच्या लोकांवर उत्तर प्रदेशमध्ये योगी पॅटर्नप्रमाणे बुलडोझर चालवले जातात, तसाच देवेंद्र फडणवीस पॅटर्ननुसार धडा शिकवला जाईल, असे आ. राणे यांनी सांगितले.

जालना जिल्ह्यातील मराठा आंदोलनकर्त्यांवर झालेल्या हल्ल्याची राज्य सरकारकडून चौकशी केली जात आहे. यात जो कोणी दोषी असेल त्यावर कारवाई नक्कीच केली जाईल. या हल्ल्यामागून काही पायाखालची वाळू सरकलेले लोक राजकीय भांडवल करीत असल्याचा टोला राणे यांनी उद्धव ठाकरे, शरद पवार यांचे नाव न घेता लावला. आज हातात काही राहिलेले नाही म्हणून घराबाहेर पडत आहे. अडीच वर्षे सरकार असताना कधी मातोश्री सोडली नाही, आता थेट जालना गाठले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चांगलेच इंजेक्शन दिल्याचा हा प्रभाव असल्याची टीका राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली. या पत्रकार परिषदेस आमदार डॉ. राहुल आहेर, भूषण कासलीवाल, मनोज शिंदे, डॉ. नितीन गांगुर्डे उपस्थित होते.

शिंदे, फडवणीसच देतील आरक्षण

राणे समितीने मराठा समाजाला आरक्षण देऊ केले होते. मात्र, गेले अडीच वर्षे मुख्यमंत्री राहिलेले उद्धव ठाकरे यांच्या नाकर्तेपणामुळे मराठा समाजाला आरक्षण मिळू शकले नाही. आज त्यांना मराठा समाजाचा कळवळा येत आहे. मराठा समाजाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अन् उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच आरक्षण मिळवून देतील, अशी ग्वाही आमदार नितेश राणे यांनी दिली.

हेही वाचा :

The post राज्यात लवकरच लव्ह जिहाद, धर्मांतर विरोधी कायदा आणणार : आमदार नितेश राणे appeared first on पुढारी.