धुळे : पुढारी वृत्तसेवा
राज्यात सायबर गुन्ह्यांचे प्रमाण पाहता आता सायबर सुरक्षा प्रकल्प हाती घेतला जाणार आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जनतेचा लुबाडला गेलेला पैसा त्यांना मिळावा तसेच गुन्हेगारांना शासन देखील व्हावे, या उद्देशाने हा प्रकल्प हाती घेण्याचा निर्णय घेतला आहे. येणाऱ्या वर्षभरात प्रकल्प पूर्ण होणार असल्याची माहिती राज्याचे अप्पर पोलीस महासंचालक संजय सक्सेना यांनी दिली आहे.
धुळ्यात पोलिसांच्या वार्षिक तपासणीच्या कार्यक्रमासाठी राज्याचे अपर पोलीस महासंचालक संजय सक्सेना हे आले होते. यावेळी वेगवेगळ्या विषयांवर त्यांनी दैनिक पुढारीशी चर्चा केली. यावेळी पोलीस अधीक्षक संजय बारकुंड, अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे, उपअधीक्षक ऋषिकेश रेड्डी हे उपस्थित होते. यावेळी माहिती देत असताना अपर पोलीस महासंचालक सक्सेना पुढे म्हणाले की, राज्यात ऑनलाइन फसवणूक तसेच सायबर गुन्ह्यांचे प्रमाण वाढत असून यात तपास करीत असतांना अनेक तांत्रिक अडचणी येत असतात. मात्र जनतेचा पैसा वेळीच त्यांना परत मिळावा, तसेच गुन्हेगारांना देखील कठोर शासन व्हावे, या उद्देशाने राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सायबर सुरक्षा प्रकल्प राबवण्याचा निर्णय घेतला आहे. या प्रकल्पा अंतर्गत एक विशेष सेल 24 तास काम करणार आहे. यापूर्वी फसवणूक झाल्याची तक्रार मिळाल्यानंतर संबंधित आरोपी हे वेगवेगळ्या बँकांमधून हा पैसा वेगाने विल्हेवाट लावत होते. त्यामुळे बऱ्याच गुन्ह्यांमध्ये पैसा परत मिळण्यासाठी अडचणी निर्माण होत असल्याची घटना घडल्या. पण नवा प्रकल्प तयार झाल्यानंतर फसवणूक होताच संबंधित बँकेचे खाते तातडीने फ्रिज केले जाणार आहे. असे करून फसवणूक झालेल्या व्यक्तीला त्याचे पैसे मिळवून देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. हा प्रकल्प येत्या वर्षभरात पूर्ण होणार असल्याची शक्यता त्यांनी यावेळी व्यक्त केली.
सध्या देशात फसवणूक होत असलेल्या राजस्थान तसेच मध्य प्रदेश आणि अन्य राज्याच्या सीमेवरील गावांमधील हॉटस्पॉट शोधण्याचे प्रयत्न सुरू आहे. यापूर्वी झारखंड राज्यातील जमतारा येथुन फसवणुकीच्या घटना अनेक वेळेस घडल्या. हा तपास करीत असताना अनेक तांत्रिक अडचणींना महाराष्ट्रातील तपास अधिकाऱ्यांना सामोरे जावे लागत होते. मात्र झारखंड सरकारने एक विशेष सेल तयार केला. या सेल मधील अधिकारी आणि कर्मचारी महाराष्ट्रातून तपास करण्यासाठी जाणाऱ्या अधिकाऱ्यांना मदतीची भूमिका घेतात. मात्र आता जमतारा व्यतिरिक्त आणखी काही ठिकाणांवरून फसवणूक होत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे अशी ठिकाणे शोधून त्यावर संबंधित राज्याच्या मदतीने उपाययोजना करण्याचे प्रयत्न देखील केली जाणार आहेत असेही ते म्हणाले.
राज्यात जिल्हा निहाय भरती होणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांचे खातेनिहाय प्रशिक्षण होत असताना त्याला गुन्हा अन्वेषण करण्याच्या तंत्रासह या खात्यातील अनेक नवनवीन माहिती देण्याचे काम सुरू असून ते आणखी अद्ययावत केले जाणार आहे. प्रत्येक पोलीस कर्मचाऱ्यांनी दोन वर्षात एकदा का होईना, असे प्रशिक्षण करण्यावर भर दिला जाणार आहे. असे केल्याने कर्मचाऱ्याला पोलीस दलात काम करत असताना येणाऱ्या अडचणींवर कशा पद्धतीने मात करावी, याविषयीची माहिती दिली जाणार आहे, असेही त्यांनी सांगितले. आगामी काळात राज्यात निवडणुकीचा कार्यकाळ सुरू होणार आहे. त्यामुळे अशा वेळेत कायदा आणि सुव्यवस्था राखली जावी, यासाठी सर्वच स्तरावर प्रयत्न करणे सुरू आहे असेही त्यांनी यावेळी सांगितले.
हेही वाचा :
- नवी सांगवी : वळणावरील खड्ड्यामुळे अपघाताची भीती
- अहमदनगर : केंद्र शासन शेतकर्यांच्या मुळावर! जिल्ह्यातील उत्पादक शेतकर्यांसह नेतेही आक्रमक
The post राज्यात सायबर सुरक्षा प्रकल्पाचे काम युद्ध पातळीवर appeared first on पुढारी.