राज्यात ११ लाख लाभार्थ्यांना २ हजारांची खावटी; ४८६ कोटी रुपयांपैकी २३१ कोटी रुपये वितरणास मंजुरी 

नाशिक : खावटी अनुदानासाठी मंजूर ४८६ कोटी रुपयांपैकी २३१ कोटी रुपयांचे वितरण करण्यास शासनाने मंजूर दिली आहे. त्यामुळे राज्यातील अकरा लाख ५५ हजार लाभार्थ्यांना खावटी अनुदानापोटी दोन हजार रुपये मिळणार आहेत. विभागाकडून लाभार्थींच्या खात्यावर अनुदान वर्ग केले जाणार आहे. 

कोरोना विषाणूचा संसर्ग आणि लॉकडाउनमुळे राज्यातील रोजंदारी करत उदरनिर्वाह करणाऱ्या आदिवासी समाजातील नागरिकांचे काम बंद पडल्याने अनेक आदिवासी कुटुंबांवर उपासमारीची वेळ आली होती. या संकटातून आदिवासी नागरिकांना सावरण्यासाठी व आर्थिक मदत करण्याच्या उद्देशाने राज्य सरकारकडून खावटी अनुदान योजना पुन्हा सुरू करण्याचा निर्णय ऑगस्ट २०२० मध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेत अनुदानापोटी सुमारे ४८६ कोटी रुपये मंजूर केले. योजनेंतर्गत प्रत्येक लाभार्थी कुटुंबास त्याच्या बँक खात्यावर दोन हजार रुपये रोख स्वरूपात, तर दोन हजार रुपयांच्या गरजेच्या वस्तू देण्याचे ठरले. 

हेही वाचा - पहिल्‍या दिवशी पॉझिटिव्ह कोरोना रिपोर्ट; दुसऱ्या दिवशी निगेटिव्ह! हा तर जिवासोबत खेळ  

११ लाख ५५ हजार नागरिक पात्र

योजनेची अंमलबजावणी करण्याच्या उद्देशाने आदिवासी विकास महामंडळातर्फे लाभार्थी कुटुंबाकडून फॉर्मदेखील भरून घेण्यात आले. महामंडळातर्फे लाभार्थ्यांना लाभ देण्यासाठी आवश्‍यक असलेली संपूर्ण माहिती जमा करण्यात आली. स्थलांतर झालेल्या लोकांचीही माहिती, त्यांच्या बँक खात्याची माहिती, आधारलिंक आदी संपूर्ण माहिती घेऊन ऑनलाइन माहिती देखील भरण्यात आली. त्यानुसार राज्यातील ११ लाख ५५ हजार नागरिक पात्र ठरले. अर्ज भरून झाल्यानंतर तसा अहवालही आदिवासी विकास महामंडळाकडून अर्थ विभागास देण्यात आला. मात्र विभागाला निधी मिळत नव्हता. अखेर २६ मार्च २०२१ रोजी शासनाकडून खावटी अनुदानापोटी २३१ कोटी रुपये निधी खर्चास शासनाने मंजुरी दिल्याने आता लाभार्थ्यांमध्ये हा निधी वितरित केला जाणार आहे. त्यानुसार ११ लाख ५५ हजार पात्र नागरिकांच्या खात्यावर दोन हजार रुपये वर्ग होणार आहेत. 

हेही वाचा - सख्ख्या भावांची एकत्रच अंत्ययात्रा पाहण्याचे आई-बापाचे दुर्देवी नशिब; संपूर्ण गाव सुन्न