राज्यात १८३ कारखान्यांमध्ये साखर उत्पादन; एप्रिलअखेर उसाचे गाळप शक्य 

मालेगाव (जि.नाशिक) : सलग दोन वर्षे झालेल्या समाधानकारक पावसामुळे या वर्षी राज्यातील १८७ साखर कारखान्यांमधून उत्पादन घेतले जात आहे. फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत यातील केवळ पाच कारखाने बंद झाले. उर्वरित १८३ कारखाने जोमात सुरू आहेत. उसाची उपलब्धता पाहता अनेक कारखाने एप्रिलअखेर उसाचे गाळप करू शकतील. राज्यात २४ फेब्रुवारीअखेर आतापर्यंत ८०१ लाख टन उसाचे गाळप झाले आहे. आतापर्यंत ८२० लाख क्विंटल साखरेचे उत्पादन घेण्यात आले आहे. 

बहुतेक कारखाने फेब्रुवारीअखेर बंद
राज्यातील कोल्हापूर, पुणे, सोलापूर, नगर, औरंगाबाद, नांदेड, अमरावती व नागपूर या आठ विभागांतून ९४ सहकारी व ९३ खासगी अशा एकूण १८७ साखर कारखान्यांमध्ये २०२०-२१ चा गळीत हंगाम घेतला जात आहे. यात कोल्हापूर विभागातून ३७, पुणे-३१, सोलापूर-४१ व नगर-२६, औरंगाबाद-२२, नांदेड-२५, अमरावती-२ व नागपूर विभागातून तीन कारखाने उत्पादन घेत आहेत. गेल्या वर्षी ऊसटंचाईमुळे १४६ कारखान्यांचा गळीत हंगाम घेण्यात आला. यातील बहुतेक कारखाने फेब्रुवारीअखेर बंद पडले. काही कारखाने मार्चच्या तिसऱ्या आठवड्यापर्यंत सुरू होते. 

हेही वाचा - ५० फूट खोल विहीर, आत ७३ वर्षांच्या आजी; दैवच बलवत्तर दुसरे काय! 

उर्वरित १८३ कारखान्यांमधून उसाचे गाळप
या वर्षी मुबलक उसामुळे १८७ कारखान्यांच्या चिमणीचा धूर ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये निघाला. फेब्रुवारीच्या तिसऱ्या आठवड्यातच कोल्हापूर विभागातील एक, तर सोलापूर विभागातील चार असे पाच कारखाने बंद झाले. उर्वरित १८३ कारखान्यांमधून उसाचे गाळप केले जात आहे. कोल्हापूर विभागाचा आतापर्यंतचा साखर उतारा सर्वाधिक ११.८ राहिला आहे. याखालोखाल पुणे-१०.५८, नांदेड-९.८३, नगर-९.४७, सोलापूर-९.२६, औरंगाबाद-९.२, नागपूर-९.०१ व अमरावती विभागाचा साखर उतारा ८.९ एवढा राहिला आहे. 

हेही वाचा - अवघ्या चारच दिवसांवर बहिणीचं लग्न अन् लग्नघरातूनच निघाली अंत्ययात्रा; दुर्दैवी घटना

उत्तर महाराष्ट्रात आठ कारखाने सुरू, १३ बंद 
उत्तर महाराष्ट्रात कादवा, वसंतदादा सहकारी, रावळगाव, द्वारकाधीश, सातपुडा तापी, आदिवासी, पुष्पदंतेश्‍वर, संत मुक्ताबाई शुगर ॲन्ड एनर्जी असे केवळ आठ कारखाने सुरू आहेत. तर निफाड, के. के. वाघ, नाशिक-पळसे, गिरणा आर्मस्ट्रॉंग, केजीएस शुगर, पांझराकान, शिरपूर, वसंत कासोदा, मधुकर, बेलगंगा, चोपडा, रावेर तालुका व मौनगिरी असे एकूण १३ कारखाने बंद आहेत. 

दृष्टिक्षेपात राज्यातील साखर उद्योग 
- एकूण साखर कारखाने- २४६ 
- या वर्षी सुरू झालेले कारखाने- १८७ 
- बंद असलेले कारखाने- ५९ 
- २४ फेब्रुवारीअखेर ऊसगाळप- ८०१.८९ लाख टन 
- २४ फेब्रुवारीअखेर साखरेचे उत्पादन- ८२०.६ लाख क्विंटल 
- २४ फेब्रुवारीअखेर राज्याचा साखर उतारा- १०.२३