Site icon

राज्यासाठी पथदर्शी प्रकल्प : सय्यद पिंप्रीत उभे राहिले निवडणूक गोदाम

नाशिक : गौरव जोशी
राज्याचा पथदर्शी प्रकल्प असलेले निवडणूक शाखेचे सुसज्ज गोदाम जिल्ह्यातील सय्यद पिंप्री येथे तब्बल पाच एकरात साकारण्यात आले आहे. या भव्य-दिव्य प्रकल्पात ईव्हीएम स्ट्राँगरूम, दोन मोठे हॉल, निवडणूक निरीक्षक केबिन यासह कर्मचार्‍यांसाठी सर्व सुविधा पुरविण्यात आल्या आहेत. या गोदामासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने 10 कोटींचा निधी उपलब्ध करून दिला.

लोकसभा-विधानसभा तसेच विधान परिषद निवडणुकांमधून मतदार लोकसभा आणि विधानसभेमध्ये त्यांचे प्रतिनिधी पाठवितात. स्थानिक पातळीवर या निवडणुका पारदर्शी आणि निर्विघ्नपणे पार पाडण्याचे काम जिल्हा निवडणूक शाखा करते. मात्र, एवढा महत्त्वपूर्ण विभाग असूनदेखील निवडणूक शाखांना जिल्हास्तरावर त्यांची हक्काची जागा नाही. त्यामुळे ईव्हीएम जतन करणे, मतदान साहित्य तसेच अन्य वस्तूंच्या जतनाकरिता या विभागाला भाडेतत्त्वावर जागा घ्याव्या लागतात. गेल्या पंचवार्षिकमध्ये केंद्र सरकारने हीच बाब हेरून प्रत्येक जिल्ह्यात निवडणूक शाखेचे स्वतंत्र गोदाम उभारण्याचा निर्णय घेतला. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सहकार्याने हे गोदाम उभे राहिले आहे. मुंबई-आग्रा महामार्गापासून अवघ्या हाकेच्या अंतरावर असणार्‍या या गोदामाच्या उभारणीमुळे निवडणूक शाखेला कायमस्वरूपी वास्तू उपलब्ध झाली आहे.

मतमोजणी कक्षासाठी प्रस्ताव….
सय्यद पिंप्री येथील गोदामात ईव्हीएम आणि अन्य मतदान साहित्य जतनासाठी जागा उपलब्ध असली, तरी मतमोजणीसाठीची अडचण कायम आहे. त्यामुळे याच गोदामाच्या वरील बाजूस मतमोजणीसाठी कायमस्वरूपी व्यवस्था करावी, यासाठी जिल्हा निवडणूक शाखेने केंद्रीय निवडणूक आयोगाला प्रस्ताव सादर केला आहे. त्यास लवकरच मान्यता मिळण्याची शक्यता आहे. तसे झाल्यास आगामी नाशिक पदवीधर मतदारसंघाची सर्व प्रक्रिया एकाच ठिकाणी होण्यास मदत मिळेल.

जागा, सुरक्षेवर खर्च…
जिल्हा निवडणूक शाखेला स्वत:ची जागा नसल्याने लोकसभा-विधानसभा निवडणुकांमध्ये अंबड येथील अन्नधान्य महामंडळाचे गोदाम भाडेतत्त्वावर घ्यावे लागते. त्यासाठी स्क्वेअर फुटानुसार भाडे प्रशासनाला भरावे लागते. 2019 च्या निवडणुकीत दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील एका उमेदवाराने निकालावर न्यायालयात धाव घेतली आहे. अद्यापही त्याचा निकाल लागलेला नाही. त्यामुळे अंबडच्या गोदामात तीन वर्षांपासून दिंडोरीचे ईव्हीएम जतन करून ठेवण्यात आले आहे. या ईव्हीएमच्या सुरक्षेसाठी 24 तास खडा पहारा तैनात आहे. प्रशासनाला जागेचे भाडे आणि सुरक्षेवर प्रशासनाचा कोट्यवधींचा खर्च झाला.

सय्यद पिंप्री येथील निवडणूक शाखेचे गोदाम तयार असून, सार्वजनिक बांधकाम विभागाकडून अद्याप आम्ही त्याचा ताबा घेतलेला नाही. याच इमारतीच्या वरील बाजूस कायमस्वरूपी मतमोजणी केंद्रासाठीचा प्रस्ताव केंद्रीय निवडणूक आयोगाला सादर केला आहे. त्याला लवकरच मान्यता मिळण्याची आशा आहे. -स्वाती थविल, उपजिल्हा निवडणूक अधिकारी, नाशिक.

हेही वाचा:

The post राज्यासाठी पथदर्शी प्रकल्प : सय्यद पिंप्रीत उभे राहिले निवडणूक गोदाम appeared first on पुढारी.

Exit mobile version