राज्य क्रिकेट संघात नाशिकच्या तिघींची निवड

नाशिकच्या तिघींची राज्य क्रिकेट संघात निवड,www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या रसिका शिंदे, माया सोनवणे व प्रियंका घोडके या तिघींची महाराष्ट्र क्रिकेट वरिष्ठ महिला संघात निवड झाली. भारतीय क्रिकेट नियामक मंडळातर्फे (बीसीसीआय) सुरत येथे आयोजित वरिष्ठ महिला टी-ट्वेंटी स्पर्धेसाठी या तिघी महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणार आहेत. पुण्यात झालेल्या चाचणी स्पर्धेतील प्रभावी कामगिरीच्या जोरावर अंतिम संघ घोषित करण्यात आला.

नाशिकची फिरकीपटू माया सोनवणेची गेल्या हंगामाच्या सुरुवातीसच भारतीय संघाच्या राष्ट्रीय शिबिरासाठी ऑस्ट्रेलिया दौर्‍यावर जाणार्‍या संभाव्य 35 खेळाडूंमध्ये निवड झाली होती. प्रतिष्ठेच्या चॅलेंजर ट्रॉफीसाठीही तिची निवड झाली होती. गेल्या वर्षी डेहराडून येथे झालेल्या महिला एकदिवसीय सामन्यांच्या स्पर्धेत तिने महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करीत 5 सामन्यांत 21 षटकांत केवळ 3.33 च्या सरासरीने 70 धावा देऊन 4 गडी बाद केले होते. सातत्यपूर्ण कामगिरीच्या जोरावर तिची लागोपाठ दोन हंगामांत प्रतिष्ठेच्या चॅलेंजर ट्रॉफीसाठी इंडिया ए संघात निवड झाली होती.

जलदगती गोलंदाज व उत्कृष्ट फलंदाज रसिका शिंदेने यापूर्वी महाराष्ट्रातर्फे 19 वर्षांखालील महिला क्रिकेट संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. सुरत येथे गेल्या वर्षी झालेल्या 19 वर्षांखालील राज्यस्तरीय महिलांसाठी 50 षटकांच्या एकदिवसीय सामन्यांच्या स्पर्धेत ती खेळली होती. ती अष्टपैलू, आघाडीची फलंदाज व ऑफस्पिनर आहे. प्रियंकाने 19 व 23 वर्षांखालील वयोगटासह वरिष्ठ महिला क्रिकेट संघातही महाराष्ट्रातर्फे पश्चिम विभागाचे प्रतिनिधित्व केले आहे.

संघटनेचे चेअरमन विनोद शाह, सचिव समीर रकटे आदींसह पदाधिकारी, सदस्य व प्रशिक्षक यांनी या तिघींचे अभिनंदन केले. महाराष्ट्राचे सामने दिल्ली (दि.11), कर्नाटक (दि.14), हरियाणा (दि.16), माणिपूर (दि.18), हिमाचल प्रदेश (दि. 20), आसाम (दि.22) या संघांविरोधात होणार आहे.

हेही वाचा :

The post राज्य क्रिकेट संघात नाशिकच्या तिघींची निवड appeared first on पुढारी.