राज्य सर्प अन् कोळी निसर्ग मानचिन्हासाठी प्रस्तावित; महसूल व वन विभागाची समिती 

नाशिक : राज्य फूल, प्राणी, फळ, पक्षी, मासा, फुलपाखरू यांच्यानंतर आता राज्य सर्प आणि कोळी यांच्या मानचिन्हांसाठी राज्य सरकारच्या महसूल व वन विभागातर्फे पूर्वतयारी सुरू झाली आहे. चंद्रपूर येथील वन्य अभ्यासक बंडू धोत्रे यांनी याबाबतची मागणी सरकारकडे निवेदनाद्वारे केली होती. तसेच राज्य वन्यजीव मंडळाच्या १६ व्या बैठकीमध्ये सदस्यांनी उपस्थित केलेल्या अतिरिक्त विषयांमध्ये राज्य सर्प आणि राज्य कोळी असे राज्याचे निसर्ग मानचिन्ह म्हणून घोषित करण्याचे प्रस्तावित केले होते. 

राज्य सर्प अन् कोळी निसर्ग मानचिन्हासाठी प्रस्तावित
मानचिन्ह घोषित करायच्या प्रजातीचे मानवी जीवनातील महत्त्व, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय मान्यतेनुसार धोकाग्रस्त असण्याची स्थिती, भविष्यातील धोके, जनजागृती आदींचा विचार करण्यासाठी सरकारने नुकतीच आठ सदस्यांची समिती स्थापन केली आहे. त्यामध्ये अभ्यासक, झुऑलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडियाचे तज्ज्ञ, कीटक व वनस्पतिशास्त्रातील तज्ज्ञ, ज्येष्ठ वनाधिकारी आदींचा समितीत समावेश आहे. वन्यजीवचे अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक सुनील लिमये समितीचे अध्यक्ष आहेत. समितीमध्ये रवींद्र वानखेडे, डॉ. रविकिरण गोवेकर, अशोक कॅप्टन, डॉ. वरद गिरी, रमेश कुमार आदींची निवड करण्यात आली. 

हेही वाचा - ह्रदयद्रावक; वडिलांसह दोन्ही लेकांची अंत्ययात्रा, एकाच वेळी ३ कर्त्या पुरुषांच्या जाण्याने कुटुंबावर शोककळा

महसूल व वन विभागाची समिती

समिती राज्यात किती निसर्ग मानचिन्हे असावीत, राज्य सर्प व राज्य कोळी घोषित करण्यासाठी त्या प्रजातीचे महत्त्व आणि संवर्धनाच्या दृष्टीने मूल्यमापन करणे, अहवाल तयार करणे आदी कामे करणार आहे. महाराष्ट्र राज्य वन-वन्यप्राणी संरक्षण व संवर्धन कार्यात अग्रेसर आहे. राज्यात ५० अभयारण्ये, पाच व्याघ्र प्रकल्प, सहा राष्ट्रीय उद्याने, सहा संवर्धन राखीव क्षेत्रे असून, राज्य फुलपाखरू निवडणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य आहे. वन्यजीव संरक्षण कायदा १९७२ अंतर्गत वन्यप्राणी, पक्ष्यांसोबत सापांचे निसर्गामध्ये मोठे महत्त्व आहे. त्याला अनुसूची-१ मध्ये ठेवण्यात आले आहे. जगात सापाच्या दोन हजार ९०० प्रजाती आढळतात. त्यातील २७० साप भारतात आढळतात. त्यांच्या संवर्धनासाठी सरकारने उचललेले पाऊल स्वागतार्ह असल्याचे प्राणिमित्र सांगतात. 

हेही वाचा - लग्नाच्या तयारीला लागलेल्या वधू-वरांचा हिरमोड! विसंगत आदेशामुळे 'वेडिंग इंडस्ट्री'त गोंधळ 

सरकारने आठ दिवसांपूर्वी तज्ज्ञांची समिती स्थापन केली आहे. सरकारचा उद्देश चांगला असून, सर्प आणि कोळी या छोट्या प्रजातीचे निसर्गात मोठे स्थान आहे. मानचिन्हाचा दर्जा मिळाल्यावर त्यांना संरक्षण मिळेल आणि जनजागृती होईल. 
-डॉ. वरद गिरी, आंतरराष्ट्रीय सरीसृप अभ्यासक, पुणे