पुढारी ऑनलाइन डेस्क – गेल्या अठरा वर्षात अनेक चढ -उतार पाहिले, चढ कमी उतारच जास्त पाहिले. याकाळात तुम्ही सगळे माझ्यासोबत राहीले. पण महाराष्ट्र सैनिकांनो संयम ठेवा, यश कुठेही जात नाही, ते मी तुम्हाला मिळवून दिल्याशिवाय राहत नाही. इतर पक्षांना जे यश मिळाले आहे, ते सहज मिळालेले नाही त्यासाठी त्यांना बरीच मेहनत घ्यावी लागली आहे. त्यामुळे संयम ठेवा असा सल्ला राज ठाकरे यांनी मनसैनिकांना दिला आहे. (Raj Thackeray)
मनसेचा 18 वा वर्धापन दिन नाशिक मध्ये पार पडतो आहे. यावेळी राज ठाकरे यांनी मनसैनिकांना मार्गदर्शन केले. राज ठाकरे म्हणाले., मला माझ्या कडेवर माझी पोरं खेळवायची आहेत, सध्या महाराष्ट्रात दुसऱ्याची पोरं कडेवर घेऊन जो आनंद काही जणांना मिळतोय तो मला नकोय, माझीच पोरं माझ्याच कडेवर घेऊन फिरण्याची माझ्यात ताकद आहे, असा टोला लगावत राज्यातील राजकीय घडामोडींवर राज ठाकरे यांनी प्रखर शब्दात टीका केली.
बटाटा टाकला की तळून आला पाहिजे, अशी मानसिकता आजकाल सगळ्यांची झाली आहे. मात्र राजकारणात तुम्हाला वावरायचे, टिकायचे असेल तर पेशन्स ठेवावा लागतो. जो इतर राजकीय पक्षांमध्ये तुम्हाला सध्या दिसत नाही. नरेंद्र मोदींचे 2014 सालचे यश हे काही रात्रीतून आलेलं यश नाही. किंवा ते फक्त नरेंद्र मोदींमुळे आलेलं यश नाही तर त्यासाठी भाजपच्या स्थापनेपासून ते आजपर्यंत अनेकांनी खूप खस्ता खाल्ल्याने व मेहनतीतून आलेलं ते यश असल्याचे राज ठाकरे म्हणाले.
The post राज ठाकरेंचा राजकीय 'सत्संग', कार्यकर्त्यांना दिला श्रद्धा आणि सबुरीचा सल्ला appeared first on पुढारी.