राज ठाकरेंचे चिरंजीव अमित ठाकरे चार दिवस नाशिक मुक्कामी

amit thakary www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना युवा नेते आदित्य ठाकरे यांच्या नाशिक दौऱ्यानंतर मनसेचे युवा नेते अमित ठाकरे येत्या ६ आॉगस्टपासून नाशिक शहर व जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. तब्बल चार दिवस ते नाशिक मुक्कामी असणार आहेत. राज्यातील बदलते समिकरणे आणि निवडणूक तयारीच्या अनुषंगाने त्यांचा दौरा असून, राज ठाकरे यांनी अमित ठाकरे यांच्याकडे याआधीच नाशिकची जबाबदारी सोपविली आहे.

गेल्या काही दिवसांपासून अमित ठाकरे यांचे महासंपर्क अभियान सुरू आहे. या अभियानाचा तिसरा टप्पा नाशिक दौरा आहे. गेल्या दोन महिन्यात महाराष्ट्रातील राजकारण नवनवीन वळणे घेत आहे. ठाकरे सरकार कोसळल्यानंतर भाजप आणि शिंदे गटाचे सरकार स्थापन झाले आहे. शिंदे सरकार स्थापन होण्यासाठी मनसेच्या एका आमदाराचा देखील पाठींबा असल्याने मनसेला देखील या राजकीय समिकरणांमध्ये महत्व प्राप्त झाले आहे. शिंदे गट राजकीय घडामोडीच्या पार्श्वभूमीवर मनसेमध्ये सामील होऊ शकतात. अशी शक्यता वर्तविली जात आहे. यामुळे मनसेकडून देखील सावध पावले टाकली जात आहेत. राजकीय नाट्य रंगलेले असताना आगामी महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसेकडून देखील मोर्चेबांधणीची तयारी सुरू झाली आहे. राज ठाकरे यांच्या नाशिकमधील दौऱ्यामध्ये त्यांनी निवडणुकीच्या अनुषंगाने नाशिकची बांधणी करण्याकरता अमित ठाकरे यांच्यावर जबाबदारी साेपविली होती. यानंतर अमित ठाकरे हे एकदाच नाशिक दौऱ्यावर येऊन गेले. राज्यभर दौरे करून विद्यार्थी संघटना बळकट करण्याचे महासंपर्क अभियानाच्या माध्यमातून सुरू आहे.

अमित ठाकरे हे त्यांच्या नाशिक दौऱ्यात महाविद्यालयांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधून मनसे विद्यार्थी संघटनेत सहभागी होण्याचे आवाहन विद्यार्थ्यांना करणार आहेत. मनसेचे जिल्हाप्रमुख अंकुश पवार, शहराध्यक्ष दिलीप दातीर आणि समन्वयक सचिन भोसले यांच्याशी चर्चा झाल्यानंतर अमित ठाकरे यांचा नाशिक दौरा निश्चित झाला आहे.

अमित ठाकरेंचा नाशिक दौरा

– ६ ऑगस्ट : इगतपुरी, सिन्नर व नाशिक तालुका.

– ७ ऑगस्ट : निफाड, येवला, नांदगाव, मालेगाव व चांदवड तालुका.

– ८ ऑगस्ट : सटाणा- देवळा, कळवण, दिंडोरी, हरसुल, सुरगाणा, त्रंबकेश्वर तालुका.

– ९ ऑगस्ट : नाशिक शहर, नाशिक पूर्व, नाशिक मध्य, नाशिक पश्चिम विधानसभा

हेही वाचा :

The post राज ठाकरेंचे चिरंजीव अमित ठाकरे चार दिवस नाशिक मुक्कामी appeared first on पुढारी.