राज ठाकरेंचे बबन घोलपांकडे दुर्लक्ष; भेट नेमकी कशासाठी?

नाशिक : पुढारी वृत्तसेवा  – ठाकरे गटातून शिंदे गटात गेलेल्या माजी मंत्री बबन घोलप यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, राज यांनी घोलपांकडे सपशेल दुर्लक्ष केल्याने ही भेट होऊ शकली नाही. ही भेट नेमकी कशासाठी होती, याचे कारण मात्र गुलदस्त्यात आहे.

राज ठाकरे गुरुवारी (दि. २०) सहकुटुंब त्र्यंबकेश्वर येथे संतश्रेष्ठ निवृत्तिनाथ महाराजांच्या पालखी सोहळ्यात सहभागी झाले होते. यावेळी त्यांनी संतश्रेष्ठ निवृत्तिनाथ महाराजांच्या समाधीचे दर्शन घेतले. त्यानंतर राज त्र्यंबकेश्वरच्या महादेव मंदिरात जात असतानाच बबन घोलप यांनी त्यांना भेटण्याचा प्रयत्न केला. ते मोठ्या आतुरतेने राज ठाकरे यांच्या गाडीजवळ गेले. मात्र, राज यांनी घोलप यांच्याकडे दुर्लक्ष केल्याने ही भेट होऊ शकली नाही. कधीकाळी राज ठाकरे आणि बबन घोलप यांनी शिवसेनेत समवेत काम केले आहे. असे असतानाही राज यांनी बबन घोलप यांना भेटणे टाळले. दरम्यान, काही दिवसांपूर्वीच बबन घोलप यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला होता.

मनसे पदाधिकाऱ्यांकडून जोरदार स्वागत

आगामी विधानसभा निवडणूक पार्श्वभूमीवर राज ठाकरे दोन दिवसांच्या नाशिक दौऱ्यावर आले. त्यांचा हा दौरा पूर्णपणे धार्मिक असला, तरी कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण करणारा ठरला. गुरुवारी (दि. २०) दुपारी १२ वाजता ते हॉटेल एक्स्प्रेस इन येथून त्र्यंबकेश्वरच्या दिशेने निघाले. यावेळी कार्यकर्त्यांनी त्यांचे जागोजागी जोरदार स्वागत केले तसेच घोषणांनी परिसर दणाणून सोडला होता.

हेही वाचा: