नाशिक : पुढारी वृत्तसेवा
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या १८ व्या वर्धापन दिनानिमित्त तब्बल तीन दिवस नाशिकमध्ये तळ ठोकून असलेले मनसेप्रमुख राज ठाकरे लोकसभा निवडणुकीविषयी रणशिंग फुंकतील, अशी जोरदार चर्चा होती. त्यांच्या आदेशाची आतुरता पदाधिकारी अन् कार्यकर्त्यांनाही होती. मात्र, लोकसभेबाबत एक शब्दही न बोलता, त्यांनी कार्यकर्त्यांना संयमाचा सल्ला दिल्यामुळे सर्वच बुचकळ्यात पडले आहेत. दरम्यान, आता राज ठाकरे यांना आलेल्या ‘त्या’ कॉलवरून तर्कवितर्क लावले जात असून, त्या १५ मिनिटांच्या कॉलनंतरच निवडणुकीच्या घोषणेला राज यांनी पूर्णविराम दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगत आहे. तसेच मनसे महायुतीच्या वाटेवर असल्याचेही बोलले जात आहे.
२०१९ च्या लोकसभा निवडणुकीतून माघार घेणारी मनसे यावेळी मैदानात उतरणार काय? याबाबतचे उत्तर राज ठाकरे वर्धापनदिनी आयोजित सभेत देेतील अशी अपेक्षा होती. मात्र, त्यांनी निवडणुकीबाबत न बोलता, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वगळता इतर सर्वच नेत्यांचा समाचार घेणे पसंत केले. त्यामुळे मनसे कार्यकर्त्यांसह इतर पक्षही बुचकळ्यात पडले असून, मनसेची नेमकी भूमिका काय असेल? याविषयी आता पक्षातच जोरदार चर्चा सुरू झाली आहे. दरम्यान, राज ठाकरे यांना आलेल्या त्या ‘कॉल’ची चर्चा आता सुरू झाली आहे. शुक्रवारी (दि. ८) नियोजित दौऱ्यासाठी सातपूरला शाखा उद्घाटनाला जात असताना राज यांना एक कॉल आला होता. त्यामुळे त्यांचा संपूर्ण ताफा रस्त्याच्या बाजूला थांबला होता. तब्बल १५ मिनिटे राज ठाकरे त्या कॉलवर बोलत होते. हा कॉल कोणाचा होता? त्यावर नेमकी काय चर्चा झाली? याविषयीची फारशी माहिती समोर आली नसली, तरी या कॉलवरून आता चर्चा रंगत आहेत.
मनसेच्या काही पदाधिकाऱ्यांच्या मते, या कॉलनंतरच राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीविषयी मनसेची भूमिका जाहीर करण्यावरून ‘संयम’ बाळगला. काहींच्या मते हा कॉल भाजपच्या वरिष्ठ नेत्याचा असावा. दरम्यान, या कॉलवरून चर्चा रंगू लागल्या असल्या, तरी मनसे लाेकसभेच्या रिंगणात उतरणार की माघार घेणार? मनसे महायुतीत जाणार की, महाविकास आघाडीला साथ देणार? मनसेतील इच्छुकांचे काय होणार? लोकसभेनंतर येणाऱ्या विधानसभा, महापालिका निवडणुकांत मनसेच्या वाट्याला काय येणार? आदी प्रश्न मनसे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये उपस्थित केले जात आहेत.
श्रीकाळारामाच्या आरतीनंतरच ‘कॉल’
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी श्रीकाळारामाचे दर्शन घेत, आगामी लोकसभा निवडणुकीचा श्रीगणेशा केला. त्यानंतर शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही श्रीकाळारामाचे दर्शन घेत, निवडणूक प्रचाराचा नारळ फोडला. राज ठाकरे यांनीही श्रीकाळारामाची महाआरती करीत, लोकसभा निवडणुकीचा शंखनाद केल्याची चर्चा रंगली होती. मात्र, ही चर्चा औटघटकेची ठरली.
The post राज ठाकरेंच्या '१५ मिनिटांचा' कॉलवरून चर्चेला उधाण; लोकसभेच्या घोषणेला पूर्णविराम appeared first on पुढारी.