राज ठाकरे आले, गेले मात्र अस्वस्‍थता ठेवूनच! कार्यकर्त्यांमध्ये संवादाऐवजी विसंवादचाची भावना

नाशिक : आगामी महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने मनसे पदाधिकारी, कार्यकर्त्यांना राज ठाकरे मार्गदर्शन करतील. त्यातून ऊर्जा मिळेल व नव्या जोमाने निवडणुकीला तोंड देता येईल, ही अपेक्षा फोल ठरली. राज ठाकरे आले व गेलेही, मात्र अस्वस्थता कायम राहिल्याची भावना बळावली आहे. मनसेची स्थापना झाल्यानंतर नाशिककरांनी सत्तेच्या रूपाने मनसेला भरभरून दान दिल्याने एकेकाळी नाशिक शहर मनसेचा बालेकिल्ला बनले. महापालिकेत सत्ता, तीन आमदार, जिल्हा परिषदेत चार सदस्य व पंचायत समित्यांमध्ये मनसेची ताकद वाढली. परंतु दिवस गेले त्याप्रमाणे पक्षाला ओहोटी लागली. 

देशभरात भाजपची लाट आल्यानंतर मनसेचा धुव्वा उडाला. मोठ्या प्रमाणात विकासकामे करूनही नाशिक महापालिकेतील सत्ता गेली. ४० वरून पाचवर सदस्य संख्या आली. गेल्या सव्वा चार वर्षांपासून नाशिक महापालिकेत भाजपची सत्ता आहे. भाजपतील सत्तेला आव्हान देणे तर सोडाच उलट सत्तेत कुठल्या-कुठल्या रूपात सहभागी झाले. आता महापालिकेची निवडणूक तोंडावर आली आहे. निवडणुकीच्या निमित्ताने शिवसेनेने प्रचाराचा धडाका लावताना शंभर प्लस नगरसेवक निवडून आणण्याचे लक्ष ठेवले आहे. भाजपने विकासकामांच्या माध्यमातून प्रचाराचा नारळ वाढविला आहे, तर राष्ट्रवादी काँग्रेसने विभागनिहाय बैठका सुरू केल्या आहेत. काँग्रेस अद्याप अंतर्गत लाथाळ्यांमध्येच रंगले आहे. महापालिका हद्दीत भाजप व शिवसेनेला तोंड देऊ शकेल एवढी ताकद मनसेकडे आहे. परंतु पक्षीय पातळीवर निवडणुकांच्या अनुषंगाने कुठलीच तयारी नसल्याने कार्यकर्ते, पदाधिकारी अस्वस्थ झाले आहेत. मनसेकडे अन्य पक्षांतील कार्यकर्त्यांचा प्रवेश करण्याचा मोठा ओघ असल्याचा दावा केला जात असला तरी त्यांच्याकडे निश्‍चित दिशा नाही. त्या मुळे पक्षाध्यक्ष राज ठाकरे नाशिकमध्ये येतील, मार्गदर्शन करतील व कार्यकर्त्यांमध्ये बळ चढून निवडणुकीच्या तयारीला लागतील, अशी अपेक्षा होती. परंतु ठाकरे यांनी त्यांचा तीन दिवसांचा नियोजित दौरा गुंडाळून परतल्याने कार्यकर्त्यांना ऊर्जा मिळण्याऐवजी त्यांच्यातील अस्वस्थताच अधिक वाढल्याचे दिसून आले. मुळात ४ मार्चला त्यांचे आगमन होणार होते. मात्र, एक दिवस पुढे ढकलले. ५ मार्चला सकाळी साडेअकराला त्यांचे आगमन झाले. त्यानंतर दोन तास हॉटेलमध्येच थांबले. त्यानंतर दोन ते अडीच तास त्यांनी खासगी भेटीगाठी केल्या. सायंकाळी विवाह सोहळ्याला हजेरी लावली. रात्री मुक्कामाला असले तरी त्या काळातही कार्यकर्त्यांची त्यांनी भेट घेतली नाही. ६ एप्रिलला सकाळी अकराच्या सुमारास मुंबईकडे परतल्याने कार्यकर्त्यांमध्ये संवादाऐवजी विसंवादच वाढल्याची भावना बळावली. 

VIDEO : "मास्क काढ तो" राज ठाकरेंचा माजी महापौरांना इशारा; विनामास्क नाशिकमध्ये दाखल

‘मी पुन्हा येईन, तयारीला लागा’ 

ठाकरे यांच्या स्वागतासाठी हॉटेलच्या परिसरात दोन दिवसांपासून ताटकळत बसलेल्या कार्यकर्त्यांना राज यांनी मुंबईकडे परतताना दर्शन दिले. त्या वेळी ‘मी पुन्हा येईन, गटप्रमुखांच्या मेळावा पुढील महिन्यात होईल. त्या वेळी मार्गदर्शन करेन’, एवढाच संदेश देत ते माघारी परतले. 
 

हेही वाचा - तरुणाच्या आत्महत्येसाठी पुन्हा पोलीसच जबाबदार? चिठ्ठीत धक्कादायक खुलासा