राज ठाकरे सहकुटुंब नाशिकमध्ये दाखल

नाशिक : पुढारी वृत्तसेवा – संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज यांच्या पालखी प्रस्थान सोहळ्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे सहकुटुंब बुधवारी (दि. १९) सायंकाळी ६.३० वाजेच्या दरम्यान नाशिकमध्ये दाखल झाले. गुरुवारी (दि. २०) दुपारी दीड वाजता त्र्यंबकेश्वर येथे संत निवृत्तीनाथ महाराज पालखी प्रस्थान सोहळ्यात ते सहकुटुंब सहभागी होणार आहेत. दरम्यान, राज ठाकरे नाशिकमध्ये दाखल होताच, पदाधिकारी तसेच कार्यकर्त्यांनी त्यांचे जय्यत स्वागत केले.

राज यांचा नाशिक दौरा निव्वळ धार्मिक असल्याचे मनसे पदाधिकाऱ्यांनी अगोदरच स्पष्ट केले असून, या दौऱ्यात पदाधिकाऱ्यांचा मेळाव, बैठका अथवा भेटीगाठीचा कुठेही कार्यक्रम आयोजित केलेला नाही. दरम्यान, राज ठाकरे गुरुवारी (दि.२०) दुपारी १२ वाजता हॉटेल एक्स्प्रेस इन येथून अंबड लिंक रोडमार्गे त्र्यंबकेश्वरकडे प्रयान करणार आहेत. यादरम्यान ते जागोजागी कार्यकर्त्यांकडून स्वागत स्विकारणार आहेत. त्यानंतर दुपारी दीड वाजता त्र्यंबकेश्वर येथील संत निवृत्ती महाराजांच्या मंदिरात ते सहकुटुंब पूजा विधी करणार आहेत. तसेच दुपारी दोन वाजता त्र्यंबकेश्वर येथील महादेव मंदिर येथे देखील त्यांच्या हस्ते पूजा विधी केली जाणार आहे. त्यानंतर दुपारी तीन वाजता ते मुंबईकडे प्रयाण करतील. दरम्यान, बुधवारी राज ठाकरे, पत्नी शर्मिला ठाकरे, मुलगा अमित ठाकरे नाशिकमध्ये दाखल झाले. यावेळी त्यांच्या स्वागतासाठी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती.

ढोल ताशांच्या गजरात स्वागत

ढोल-ताशांच्या गजरात राज यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी पदाधिकाऱ्यांनी परिसरात स्वागताचे होर्डिंग्ज लावले होते. प्रदेश सरचिटणीस अशोक मुर्तडक, प्रदेश उपाध्यक्ष सलीम शेख, शहराध्यक्ष सुदाम कोंबडे, जिल्हाध्यक्ष अंकुश पवार यांच्यासह कोअर कमिटीची सदस्य उपस्थित होते.

हेही वाचा: