राणे पिता-पुत्रांविरोधात युवासेनाचा श्‍वान सोडण्याचा प्रयत्न फसला! सचिन वाझेंशी संबंध असल्याचा आरोप

नाशिक : मुंबई पोलिस दलातील एन्काउंटर स्पेशालिस्ट सचिन वाझे यांच्याशी संबंध असल्याच्या आरोपावरून भाजपचे आमदार नीतेश राणे व युवासेनाचे सचिव वरुण सरदेसाई यांच्यातील वादाचे पडसाद नाशिक शहरात उमटले.

श्‍वानांच्या गळ्यात राणे पिता-पुत्रांच्या नावाच्या पाट्या

राणे यांनी केलेल्या आरोपाचा निषेध म्हणून युवासेनाच्या कार्यकर्त्यांनी भाजप कार्यालयात श्‍वानांच्या गळ्यात राणे पिता-पुत्रांच्या नावाच्या पाट्या लावून आंदोलन केले. आंदोलन करताना भाजप कार्यालयात श्‍वान सोडण्याचा प्रयत्न केला; परंतु पोलिसांनी तो प्रयत्न हाणून पाडला. भाजपने आंदोलनाला प्रत्युत्तर देताना भद्रकाली पोलिस ठाण्यासमोर आंदोलन करत युवासेनाच्या पदाधिकाऱ्यांना अटक करण्याची मागणी केली. 

भाजप कार्यालयासमोर आंदोलन
सचिन वाझे प्रकरणावरून विधानसभेत महाविकास आघाडी विरुद्ध भाजप, असा सामना रंगला होता. संपूर्ण अधिवेशन याच विषयाभोवती फिरले. वाझे यांना पदावरून हटविल्यानंतर वाद शमेल, असे वाटत असतानाच नीतेश राणे यांनी युवासेनाचे सचिव वरुण सरदेसाई यांच्यावर आरोप केल्याने वाद रस्त्यावर उतरला. सचिन वाझे सट्टेबाजांकडून पैसे घेतात व त्यातील वाटा शिवसेनेच्या नेत्यांना जातो, असा आरोप नीतेश यांनी केला होता. युवासेनाचे सरचिटणीस वरुण सरदेसाई यांच्या नावाचा उल्लेख त्यांनी केला होता. त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी शिवसेनेची शाखा असलेल्या युवासेनाच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी राणे यांच्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी नाशिक शहर भाजप कार्यालयासमोर आंदोलन केले.

राणे पिता-पुत्रांविरोधात जोरदार घोषणाबाजी

मंगळवारी (ता. १६) दुपारी बाराच्या सुमारास दोन श्‍वानांच्या गळ्यात नारायण राणे व नीतेश राणे यांच्या नावाची पाटी बांधून भाजप कार्यालयात सोडण्याचा प्रयत्न केला. राणे पिता-पुत्रांविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. युवासेनाचे जिल्हाध्यक्ष आदित्य बोरस्ते, नगरसेवक दीपक दातीर, गणेश बर्वे, रूपेश पालकर, समर्थ मुठाळ, सचिन निकम, किरण पाटील, अभिजित गवते, पवन दातीर, अमोल निमसे आदींनी आंदोलन केले.