रात्रीच्या अंधारात शासकीय हजेरी रजिस्टर कार्यालयाबाहेर फेकण्याचा प्रकार; पोलिसांत तक्रार

नाशिक : रात्रीच्या अंधारात कर्मचारी हजेरी रजिस्टर कार्यालयाबाहेर फेकण्याचा प्रकार मुख्य वनसंरक्षक (प्रादेशिक) कार्यालय, नाशिक येथे घडला. याप्रकरणी कार्यालयाचे प्रशासकीय अधिकारी विनायक नाकाडे यानी भद्रकाली पोलिस ठाण्यात चौकशी करत कारवाई करण्याकामी तक्रार अर्ज दाखल केला. काय घडले नेमके?

रजिस्टर कार्यालय बाहेर फेकल्याचा प्रकार
गुरुवारी (ता. ४) हा प्रकार उघडकीस आला. रखवालदार सचिन कदम बुधवारी (ता.३) मध्यरात्री कार्यालय परिसरात गस्त घालत असताना बाहेरील परिसरात रजिस्टर आढळले. त्यांनी रजिस्टरला हात न लावता अधिकाऱ्यांना फोनद्वारे माहिती दिली. त्यांनी दिलेल्या सूचनेनुसार रजिस्टर उचलून कार्यालयात ठेवले. उशिराने येणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या हजेरीसाठी स्वतंत्र रजिस्टर ठेवले आहे. तेच रजिस्टर असल्याची माहिती समोर आली. गुरुवारी कार्यालयाचे प्रशासकीय अधिकारी विनायक नाकाडे यानी याप्रकरणी चौकशी व्हावी, या आशयाचे पत्र आणि रखवालदाराचा जबाब त्यांच्या कर्मचाऱ्यामार्फत भद्रकाली पोलिसात दाखल केला. रजिस्टर कार्यालय बाहेर फेकल्याचा प्रकार कार्यालयातील कर्मचाऱ्यांपर्यंत पोचल्यानंतर कर्मचाऱ्यांमध्ये चांगलीच चर्चा रंगली होती. उशिराने येणाऱ्या कर्मचाऱ्याचे हजेरी रजिस्टर असल्याने कुणी उशिरा येणाऱ्या कर्मचाऱ्यानेच प्रकार केला असावा, अशी शक्यता काहींनी व्यक्त केली. 

हेही वाचा - ही कसली स्टंटबाजी? पठ्ठ्याचे शेतात चक्क बिबट्यासोबत फोटोसेशन; VIDEO व्हायरल

सीसीटीव्हीचा अभाव 
कार्यालयात सीसीटीव्ही कॅमेरा नसल्याची बाब यानिमित्ताने समोर आली. आवारातील वृक्षतोडीचे प्रकारही यापूर्वी घडले आहेत. तसेच, रजिस्टर फेकल्याचा प्रकार घडला आहे. यापुढे अशा प्रकारांसह अन्य कुठले प्रकार घडता कामा नये. यासाठी कार्यालयासह परिसरात सीसीटीव्ही बसविणे आवश्‍यक आहे.  

हेही वाचा - अखेर त्या 'बालिकावधू'ची मृत्युशी झुंज संपली; विवाह तिच्यासाठी ठरला मृत्यूचे फर्मानच