नाशिक : पुढारी वृत्तसेवा – सर्व जाती, धर्माच्या १४० कोटी लोकांचा हा देश आहे. हिंदू, मुस्लीम, सवर्ण यांच्यात भांडणे होत असतात, पण हा देश त्यांचा असून संविधानाने त्यांना एकसंध बांधले आहे. भारताचे संविधान मजबूत असून, इंडिया आघाडीकडून केला गेलेला संविधान बदलाचा प्रचार दिशाभूल करणारा आहे. नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेताना संविधानावर माथा टेकला. मात्र इंडिया आघाडीचे नेते राहुल गांधी यांनी कधीच संविधानावर आपला माथा टेकला नाही, अशा शब्दांत रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी राहुल यांच्यावर टीका केली.
महाकवी कालिदास कलामंदिर येथे रिपब्लिकन पक्षाच्या उत्तर महाराष्ट्र पदाधिकाऱ्यांच्या वतीने आयोजित नागरी सत्कार सोहळ्यात ते बोलत होते. व्यासपीठावर पालकमंत्री दादा भुसे, आ. सीमा हिरे, शिवसेना गटनेते अजय बोरस्ते, विजय करंजकर, रिपाइं उत्तर महाराष्ट्रप्रमुख प्रकाश लोंढे, युवक जिल्हाप्रमुख अमोल पगारे, संतोष कटारे, चंद्रशेखर कांबळे, नारायण गायकवाढ, दीक्षा लोंढे आदी उपस्थित होते.
आठवले म्हणाले, देशात कित्येक वर्षे काँग्रेस सत्तेत होती, पण त्यांनी संसद भवनातील सेंट्रल हॉलमध्ये डॉ. बाबासाहेबांची प्रतिमादेखील लावली नाही. डॉ. बाबासाहेबांना भारतरत्न हा किताबदेखील काँग्रेसने दिला नाही. त्यामुळे ‘राहुल गांधींनी जेवढे बोलायचे तेवढे बोला, मी देतो तुम्हाला टोला’ अशीही टीका आठवले यांनी केले. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डॉ. बाबासाहेबांची सर्व स्मारके पूर्ण केली आहेत. दलितांच्या उत्कर्षाचे अनेक निर्णय त्यांनी घेतले आहेत. राहुल गांधी या देशातील महिलांच्या खात्यात खटाखट पैसे टाकणार होते. पण, नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांच्या खात्यात पटापट पैसे टाकले. त्यामुळे इंडिया आघाडीकडून संविधान बदलाचा केला जात असलेला प्रचार खोटा असून, या देशाचे संविधान बदलण्याची ताकद कोणाच्या बापात नसल्याचेही आठवले म्हणाले.
यावेळी आठवले यांनी मंत्री दादा भुसे यांच्याकडे, राज्य सरकारने दलितांसाठीच्या योजना प्रभावीपणे राबवाव्यात, महामंडळांच्या माध्यमातून घेतलेले सर्व कर्ज माफ करावे, भूमिहिनांंना पाच एकर जमीन द्यावी आदी मागण्याही केल्या. दरम्यान, रिपाइंच्या उत्तर महाराष्ट्र पदाधिकाऱ्यांकडून आठवले यांचा न्यायदेवतेची मूर्ती देऊन सत्कार करण्यात आला.
उत्तर महाराष्ट्राला हवे मंत्रिपद
जिल्हाप्रमुख प्रकाश लोंढे यांनी उत्तर महाराष्ट्राला महामंडळ किंवा मंत्रिपद द्यावे अशी अपेक्षा यावेळी बोलून दाखविली. तसेच माझ्यापेक्षा वयाने लहान पदाधिकाऱ्यांना तुम्ही मंत्री केले, महामंडळे दिली, महापौरपदी विराजमान केले. मात्र, मी निष्ठेने पक्षवाढीवर भर दिला, कधीही कुठली अपेक्षा ठेवली नसल्याची खदखद बोलून दाखविताना, महाराष्ट्राला जे काही द्याल त्यात उत्तर महाराष्ट्राचा विचार करावा, अशी मागणी लोंढे यांनी केली.
आठवलेंच्या चारोळ्या
- इंडिया आघाडीवर आणली होती बंदी; म्हणूनच पंतप्रधान झाले नाहीत राहुल गांधी
- बाबासाहेबांचे जर कोणी बदलेल संविधान; जय भीमवाला त्याची घेईल जान
- बाबासाहेबांनी या देशाची वाढवली शान; म्हणून जगाचे आहे देशाकडे ध्यान
- जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत दादा भुसे; ते भरून काढतील पैशांनी तुमचे खिसे
- लोकसभेत आमच्या जागा आल्या फक्त सतरा; विधानसभेत नाही खतरा
- जय भीम आहे आमच्या गाठीशी; म्हणूनच आम्ही आहोत महायुतीच्या पाठीशी
- जोपर्यंत नरेंद्र मोदी आणि या पठ्ठ्याची जोडी; तोपर्यंत जाणार आमची पुढे पुढे गाडी
हेही वाचा: