
जळगाव : पुढारी वृत्तसेवा
जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यात बुधवारी (दि. 5) मध्यरात्री पावसाने जोरदार हजेरी लावल्याने नदी, नाल्यांना आलेल्या पुरात तिघांचा मृत्यू झाला आहे. तर 145 घरांची पडझड झाली आहे. पुराच्या पाण्यात वाहून गेल्याने 20 गुरे दगावली आहेत.
रावेर तालुका हा मध्य प्रदेशाच्या सीमेवर आहे. त्यात रावेर तालुका आणि मध्य प्रदेशात रात्री मुसळधार पाऊस झाल्याने सुकी धरण पूर्ण क्षमतेने भरून ओव्हरफ्लो झाले आहे. रात्री अभोडा येथील तसेच शहरातून गेलेल्या नागझिरी नदीला मोठा पूर आला आहे. रात्री दोन ते तीन तास झालेल्या मुसळधार पावसामुळे तालुक्यातील नागझिरी नदी, मात्रान नदी, रसलपूर येथील नदीला पूर आला आहे. अभोडा येथील नदीच्या पुरात बाबूराव रायसिंग बारेला तर रावेर शहरातील फुकटपुरा येथील रहिवासी इक्बाल सत्तार कुरेशी (56) यांचा नागझिरी नदीत बुडून मृत्यू झाला. तर एक जण बेपत्ता असून, त्याचा रात्रीपासून शोध सुरू आहे. दोघे ज्या दुचाकीवरून जात होते ती दुचाकी आढळली असून, त्यातील एकाचा मात्र अद्यापपर्यंत शोध लागलेला नाही. तर रसलपूरमध्ये बलेनो कार वाहून गेली असून, प्रवाशांनी गाडीतून उडी घेतल्याने सुदैवाने सर्व प्रवासी बचावले आहेत.
145 घरांची पडझड …
रात्री पुराचे पाणी नदीकाठावरील अनेक घरांमध्ये घुसल्याने नागरिकांचे संसारोपयोगी साहित्याचे नुकसान झाले. यासोबत रमजीपूर रसलपूर, खिरोदा गावांमध्ये अनेक घरांमध्ये दुकानांमध्ये पाणी शिरले आहे. तसेच रमजीपूरमध्ये आलेल्या पुरामुळे चार गुरे वाहून गेले आहे. खिरोदा प्र रावेर येथील 10 ते 12 गुरे पुराच्या पाण्यात वाहून गेल्याची माहिती नागरिकांनी दिली आहे. आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या माहितीनुसार, पुराच्या पाण्यात दहा बकऱ्या, नऊ गायी आणि एक म्हैस वाहून गेली आहे. तर 145 घरांची पडझड झाली आहे.
हेही वाचा :
- नाशिकरोडचे पोलिस उपनिरीक्षक लाच घेताना जाळ्यात, पंधरा दिवसांत दुसरा पोलिस अधिकारी अटकेत
- पुणे : लेखक सत्याला सामोरे जात नाहीत; नियोजित संमेलनाध्यक्ष डॉ. रवींद्र शोभणे यांची खंत
- पुणे : कार्यकर्त्यांच्या अरेरावीमुळे कर्मचारी त्रस्त; कार्यकर्ते- कर्मचारी वाद अधिकार्यांपर्यंत पोहचला
The post रावेरला पुरात तिघांचा मृत्यू, 145 घरांची पडझड, 20 गुरे दगावली appeared first on पुढारी.