राष्ट्रपतीपदी आदिवासी महिला विराजमान पण पाड्यांवरील रुग्णांना अद्याप झोळीचाच आधार

आदिवासी

जव्हार (नाशिक); तुळशीराम चौधरी : केंद्र सरकार डिजिटल व कॅशलेस इंडियाची भाषा करीत आहे. राज्य सरकारकडून आरोग्य यंत्रणा तुमच्या दारी अशी संकल्पना राबविण्यात येत आहे. दुसरीकडे आदिवासी महिलेला राष्ट्रपती होण्याचा बहुमान मिळाला आहे. तरी देखिल अद्याप आदिवासी पाड्यांवरील समस्या जशाच्या तशा आहेत. अद्यापही या आदीवासी पाड्यावर कोणत्याही सुविधा पोहचल्या नाहीत. आज या पाड्यांवरील रुग्णांना, गरोदर मातांना, वृद्धांना झोळीत घालून डोंगर, दऱ्या आणि वाहणाऱ्या नदीचे अडथळे पार करुन कोसोदूर असणाऱ्या रुग्णालयांपर्यंत पोहचावावे लागते. आदिवासी महिला राष्ट्रपती झाली म्हणून या समाजाची दुख: नष्ट होत नाही. ना शेवटच्या घटकापर्यंत विकास पोहचला जातो. सामान्यांना रोजच्याच जगण्यासाठी संघर्ष करावा लागतो. गुरुवारी (दि.२१) देशाच्या राष्ट्रपती एका आदिवासी महिलेची निवड झाली पण, शुक्रवारी अशाच एका आदिवासी महिलेला रुग्णालयात पोहचवण्यासाठी झोळीमध्ये घालून डोंगर दऱ्या पार करत रुग्णालयात पोहचवावे लागले.

पाथर्डी ग्रामपंचायत हद्दीतील भाटीपाड्यातील एका रुग्ण महिलेला चालता येत नसल्याने, त्या रुग्णाला ग्रामस्थांनी झोळीत बांधून वाहत्या नदीतून डोंगर, टेकड्या चढत, जव्हारच्या कुटीर रुग्णालयात दाखल केले आहे. रुग्ण महिलेला झोळीत बांधून काळशेती नदीतुन रुग्णालयात दाखल केल्याचा प्रकार शुक्रवारी (दि. २२ जुलै) घडला आहे. या भागातील गरोदर महिलांसह रुग्णांचे अतोनात हाल होत असून, स्वातंत्र्यानंतर त्या भाटीपाडयातील रुग्णांसह, नागरिकांनाही हाल सहन करावे लागत आहेत.

जव्हार तालुक्यातील ग्रामपंचायत पाथर्डी पैकी भाटीपाडा येथील ४० वर्षीय लक्ष्मी लक्ष्मण घाटाळ ह्या महिलेच्या पायाला मोठी दुःखापत झाली होती. जखम अधिक वाढत गेल्याने, या रुग्ण महिलेला पायी चालणे कठीण झाले. ह्या जखमी महिलेला रुग्णालयात दाखल केले नाही, तर ते जीवावर बेतणार होते. अखेर तेथील ग्रामस्थांनी त्या जखमी महिलेला झोळीत बांधून वाहत्या काळशेती नदीतून मार्ग काढावा लागला. काळशेती नदीचे १०० मीटरचे पात्र असून ती मोठी नदी आहे. सध्या पाऊस असल्याने, नदीचे पात्र भरून वाहत आहे. भरुन वाहणाऱ्या नदीतून मार्ग काढत महिलेला झोळीतून डोंगर, टेकड्या चढून मुख्य रस्त्यापर्यंत ३ किलोमीटर पायी प्रवास करत जव्हारच्या कुटीर रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

जव्हार तालुक्यातील ग्रामपंचायत पाथर्डी हद्दीतील भाटीपाड्यात एकूण ३५ कुटुंबे वास्तव्य करीत आहेत. हा भाटीपाडा काळशेती नदीच्या बाजूने आहेत. भाटीपाडा गावात जाण्यासाठी रोजगार हमीतून केलेला कच्चा रस्ता आहे. तसेच पावसाळयात साधी मोटारसायकल देखील त्या भाटीपाड्यात जात नाही. त्यामुळे पावसाळयात रस्ता बंद असतो. तसेच भाटीपाड्यात जाण्यासाठी काळशेती नदीवर पूल नाही. यामुळे पावसाळयात रुग्ण, गरोदर महिला, सर्प दंश झालेल्या रुग्णांचे हाल होऊन अनेकांना जीव गमवावा लागला आहे.

भाटीपाड्यात नागरिकांनी अनेक वर्षांपून नदीवर पूल आणि रस्त्याची मागणी करीत आहेत. मात्र त्या गाव-पाड्यांतील ग्रामस्थांच्या मागणीकडे सतत दुर्लक्ष केले जात आहे. तसेच या भागात पाथर्डी पैकी भाटीपाडा, तर ग्रामपंचायत झापचे काही पाडे असून, असे जवळपास ४ ते ५ पाडे आहेत. मात्र त्या आदिवासी पाड्यांना स्वातंत्र्यपासून रस्ताच झाला नाही. तर पावसाळयात त्या परिसरातील नागरिक व रुग्णांचे नेहमीच हाल हे आता कायमचे वास्तव बनले आहे.

त्या आदिवासी पाड्यांना अजूनही रस्ताच नाही, तर मग रुग्णवाहिका येणार तरी कुठून? ग्रामस्थ रुग्णवाहिकेची वाट न पहाता पिढ्यानपिढ्या रुग्णांना व गरोदर महिलांना रुग्णालयात पोहचविण्यासाठी झोळीचा आधार घेत आहेत.

गरोदर महिलांची बाळंतपणे होतात नातेवाईकांडे

मनमोहाडी, भाटीपाडा अन्य येथील पाड्यातील गरोदर मातांची प्रसुतीची वेळ जवळ आली कि या मातांना तालुक्यातील नातेवाईकांकडे येवून थांबावे लागते. असे केल्यावर कुंटुबाची होणारी धावपळ व अबाळ थांबली जाते. पण, यामुळे नातेवाईकांना त्रास देण्याची वेळ या पाड्यावरील लोकांवर येते.

The post राष्ट्रपतीपदी आदिवासी महिला विराजमान पण पाड्यांवरील रुग्णांना अद्याप झोळीचाच आधार appeared first on पुढारी.