राष्ट्रवादी काँग्रेसची समाजांमध्ये दुही निर्माण करण्याची परंपरा : देवयानी फरांदे

देवयानी फरांदे,www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सत्तेतून बाहेर गेला की समाजातील दोन वर्गांमध्ये मतभेद निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो. समाजात दुही निर्माण करण्याची राष्ट्रवादी काँग्रेसची परंपरा असल्याची टीका करीत आमदार प्रा. देवयानी फरांदे यांनी राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांच्या वक्तव्याचा निषेध केला.

काहीही संबंध नसताना भुजबळ यांनी सरस्वती देवीविषयी जाणीवपूर्वक राजकीय फायद्यासाठी चुकीचे वक्तव्य केले. या वक्तव्यामागे हिंदुत्ववादी विचार व ओबीसी समाज यांच्यात दुही निर्माण करणे हा उद्देश आहे. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले व जोतिबा फुले हे अस्तिक होते. देव-देवतांवर त्यांची श्रद्धा होती. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचे काव्यफुले या काव्यसंग्रहाच्या मुखपृष्ठावर शंकर पार्वतीचे चित्र आहे. ओबीसी समाज हा हिंदू समाजाचा कणा आहे. कोणी कितीही प्रयत्न केले तरी तो हिंदू धर्मापासून लांब जाणे शक्य नाही, असे सांगतानाच अडीच वर्षे भुजबळ राज्यात मंत्री होते. त्यांच्या पक्षाचे सरकार होते, त्यावेळेस सरस्वती देवीचा फोटो काढण्याची हिंमत का दाखवली नाही? असा सवाल आमदार फरांदे यांनी उपस्थित केला.

हिंदुत्वाचा देखावा करणारी शिवसेना आता शांत का? असा प्रश्न करत देव-देवता व धर्म हे महत्त्वाचे आहेतच. त्याचबरोबर फुले, शाहू, आंबेडकर हे राष्ट्रपुरुष आहेत. या दोन्हींबाबत महाराष्ट्रातील जनतेच्या मनात नितांत आदर आहे. अशा प्रकारचे नाहक वक्तव्य करून महाराष्ट्रात दोन समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न छगन भुजबळ यांनी करू नये, असा विनंतीवजा इशारा आमदार फरांदे यांनी दिला आहे.

सत्ता गेल्यावर गोऱ्हेंना महिलांची आठवण

सत्ता गेल्यानंतर नीलम गोऱ्हे यांना महिलांची आठवण झाली का? असा सवाल आमदार देवयानी फरांदे यांनी केला आहे. महाराष्ट्रातील कायदा व सुव्यवस्था खराब होण्यासाठी ठाकरे सरकारच जबाबदार असल्याचे सांगताना महाराष्ट्रातील रेट ऑफ कन्व्हेक्शन ६० टक्केवरून ४० टक्केपर्यंत कमी कसा झाला? मागील सरकार हे वसुली सरकार होते, असा आरोप करताना राज्यातील गृहमंत्री व पोलिस आयुक्तांवर भ्रष्टाचाराचे आरोप होऊन गृहमंत्री अद्यापही जेलमध्ये असल्याची आठवण आमदार फरांदे यांनी करून दिली. दाऊदशी संबंध असणाऱ्या नवाब मलिकांना जेलमध्ये असतानाही मंत्रिपद कायम ठेवले होते, याची आठवणही त्यांनी करून दिली.

हेही वाचा :

The post राष्ट्रवादी काँग्रेसची समाजांमध्ये दुही निर्माण करण्याची परंपरा : देवयानी फरांदे appeared first on पुढारी.