राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्‍या पदाधिकाऱ्यांतच हाणामारी; वाद चव्हाट्यावर  

सिडको (नाशिक) : आर्थिक वादातून दोन-तीन जणांनी बेदम मारहाण करत एकास जखमी केल्‍याचा प्रकार सिडकोत घडला. या प्रकरणातील संशयित व जखमी दोन्‍ही राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसशी निगडित आहेत.

राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्‍या पदाधिकाऱ्यांतच हाणामारी
अंबड पोलिस ठाण्यात दाखल तक्रारीनुसार, संशयित नंदन बाळासाहेब भास्करे, अमृत धर्मराज भास्करे, अक्षय बाळासाहेब दाते यांनी शनिवारी (ता. ६) दुपारी पावणेपाचच्‍या सुमारास त्रिमूर्ती चौकातील सुवर्णा मोटारसायकल सर्व्हिसेस येथे आकाश कदम यास बेदम मारहाण केली. गॅरेजमधील लोखंडी रॉड व फरशीच्या तुकड्यांनी फिर्यादी कदमला मारहाण करत जखमी केले. तसेच आकाश कदमच्‍या खिशातील चार हजार रुपये झटापटीत पडून गेले. 

हेही वाचा- रस्त्यावर फेकलेली 'नकोशी' झाली 'हवीशी'! नुकत्याच जन्मलेल्या शकुंतलाला मिळाले आई-बाबा

सिडकोतील प्रकार : जखमी कदमवर उपचार सुरू 

या संघटनेचा जिल्‍हाध्यक्ष नंदन भास्‍करेविरोधात जखमी आकाश कदम याने अंबड पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. दरम्‍यान, संशयित नंदन भास्‍करे आणि जखमी कदम यांची व्‍यावसायिक भागीदारी होती. यातील आर्थिक वाद होऊन कदमने या भांडणापूर्वी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस पक्षाच्‍या कार्याध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. संशयित भास्‍करेकडे संघटनेचे जिल्‍हाध्यक्षपद आहे. वाद विकोपाला गेल्‍यानंतर हा मारहाणीचा प्रकार घडल्‍याचे बोलले जात आहे. दरम्‍यान, या घटनेमुळे विद्यार्थी संघटनांचे पदाधिकाऱ्यांमध्ये असलेले वाद चव्हाट्यावर आले आहेत.  

हेही वाचा - अखेर त्या 'बालिकावधू'ची मृत्युशी झुंज संपली; विवाह तिच्यासाठी ठरला मृत्यूचे फर्मानच