Site icon

राष्ट्रीय मतदार दिन : देशाच्या उज्जल भविष्यासाठी जागरूक राहावे – उपजिल्हाधिकारी वासंती माळी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

लोकशाहीत सार्वत्रिक निवडणुका सर्वांत महत्त्वाचा घटक आहे. निवडणुकांच्या माध्यमातूनच देशाचे सरकार बनते. सरकार बनविण्याचा अधिकार देशातील प्रत्येक व्यक्तीला असून, मतदान करणे जबाबदार नागरिकाचा हक्क आणि कर्तव्य आहे. त्यामळे देशाचे उज्ज्वल भविष्य घडण्यासाठी तरुणांनी मतदानाबाबत जागरूक राहणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन उपजिल्हाधिकारी वासंती माळी यांनी केले. नवजीवन विधी महाविद्यालयात राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त आयाेजित जनजागृती कार्यक्रमाप्रसंगी त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी प्राचार्या डॉ. शाहिस्ता इनामदार होत्या. व्यासपीठावर नायब तहसीलदार विठ्ठल मोराणकर आदी उपस्थित होते.

उपजिल्हाधिकारी माळी म्हणाल्या, २५ जानेवारी १९५० रोजी निवडणूक आयोगाची स्थापना झाली. त्यामुळे देशात हा दिवस राष्ट्रीय मतदारदिन म्हणून साजरा केला जातो. या दिवशी मतदारांना त्यांच्या हक्काबाबत जागरूक करण्यासाठी विविध कार्यक्रम घेतले जातात. विशेषत: १८ वर्षांच्या तरुणांना ओळखपत्रे देणे, मतदारांना मतदानासाठी प्रोत्साहित केले जाते. यानिमित्ताने मतदारांना त्यांच्या शक्तीची जाणीव करून देणे प्रशासनाचे प्रमुख उद्दिष्ट असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी पॉवरपॉइंट प्रझेंटेशनद्वारे मतदार नोंदणी, नाव-पत्ता बद्दल, नोंदणीसाठी लागणारे पुरावे, मतदार स्मार्ट कार्ड आदींसह विविध प्रक्रियेसाठी लागणारे फॉर्म याबाबत त्यांनी सविस्तर माहिती दिली. तसेच विद्यार्थ्यांची मतदार नोंदणीदेखील करून घेण्यात आली. प्रातिनिधिक स्वरूपात प्रेरणा चारोस्कर व अरुण पवार या विद्यार्थिनींचे नोंदणी अर्ज माळी यांनी स्वीकारले. यावेळी निवडणूक आयोगाने निर्धारित केलेली लोकशाहीच्या रक्षणासाठी जागरूक राहण्याची शपथही उपस्थितांना देण्यात आली. अध्यक्षीय मनोगतात डॉ. इनामदार यांनी लोकशाही बळकटीकरणासाठी प्रत्येकाने मतदानाचा अधिकार बजावला पाहिजे, असे आवाहन केले. प्रा. मकरंद पांडे यांनी सूत्रसंचालन, तर विद्यार्थिनी वैष्णवी कुलकर्णी हिने आभार मानले. याप्रसंगी डॉ. प्रज्ञा सावरकर, डाॅ. समीर चव्हाण, प्रा. उलका चव्हाण, महेंद्र विंचूरकर, अनिल देशमुख, ग्रंथपाल मंगल पाटील, अलका लोखंडे, अतुल उंबरकर, हर्षल अणेराव आदी उपस्थित होते.

The post राष्ट्रीय मतदार दिन : देशाच्या उज्जल भविष्यासाठी जागरूक राहावे - उपजिल्हाधिकारी वासंती माळी appeared first on पुढारी.

Exit mobile version