राष्ट्रीय मतदार दिन: लोकशाहीच्या बळकटीसाठी सजग राहून मतदान करा – जिल्हाधिकारी मनीषा खत्री

नंदुरबार www.pudhari.news

नंदुरबार : पुढारी वृत्तसेवा

लोकशाही बळकट करण्यासाठी मतदारांनी सजग राहून मतदान करावे, असे आवाहन जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांनी केले.

जिल्हाधिकारी कार्यालयात बिरसा मुंडा सभागृह येथे आयोजित राष्ट्रीय मतदार दिवस कार्यक्रमात त्या बोलत होत्या. यावेळी प्रभारी उपजिल्हा निवडणूक अधिकारी शाहूराज मोरे, उपजिल्हाधिकारी कल्पना निळ-ठुंबे, तहसिलदार उल्हास देवरे, भाऊसाहेब थोरात, गटशिक्षणाधिकारी निलेश पाटील, नायब तहसिलदार रिनेश गावीत, आशा सोनवणे आदी उपस्थित होते. खत्री म्हणाल्या की, लोकशाही बळकट करण्यासाठी प्रत्येक निवडणूक प्रक्रियेत सर्व मतदारांनी मतदान करणे आवश्यक आहे. यासाठी नवयुवकांनी स्वत:हून जास्तीत जास्त मतदान नोंदणी करावी. मतदान नोंदणी व मतदानाचे प्रमाण वाढविण्यासाठी सर्व नागरिकांनी मतदान जनजागृतीसाठी स्वत: व इतर नागरिकांना प्रोत्साहित करावे. तसेच नागरिकांनी कोणत्याही अमिषाला बळी न पडता मतदान करण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

मोरे म्हणाले की, केंद्रस्तरीय अधिकारी यांनी अतिशय चांगले काम केले असून अशाच प्रकारचे चांगले काम त्यांनी यापुढेही करावे. देशाचे उज्वल भविष्य घडविण्याची नवमतदारांनीही मोठया प्रमाणात मतदान करावे. तसेच राष्ट्रीय मतदान दिनानिमित्त रांगोळी स्पर्धा, निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, चित्रकला स्पर्धेत सहभाग घेतलेल्या सर्व स्पर्धकांचे त्यांनी यावेळी अभिनंदन केले.

प्रास्ताविकात निळ-ठुंबे म्हणाल्या की, मतदारांचा निवडणूक प्रक्रियेतील सहभाग वाढावा, मतदारांमध्ये जागरुकता निर्माण व्हावी यासाठी बुधवार, दि. 25 रोजी देशभरात राष्ट्रीय मतदार दिन म्हणून साजरा केला जातो. या दिवशी मतदारांना विशेषत: नवमतदारांना मतदार यादीत नाव नोंदणीसाठी प्रोत्साहित केले जाते. तसेच भारत निवडणूक आयोगामार्फत आजच्या दिवशी विविध उपक्रम राबविले जात असून मतदार नोंदणी व इतर सुविधा मतदारांना उपलब्ध होण्यासाठी व्होटर हेल्पलाईन सुविधा ॲप, गरुडा ॲपची सुविधा आयोगाने उपलब्ध करुन दिली आहे. आजच्या दिवशी भारत निवडणूक आयोगामार्फत ‘मै भारत हूँ’ या गीताचे प्रक्षेपण करण्यात आल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. भाऊसाहेब थोरात यांनी आभार मानले. यावेळी विद्यार्थ्यांसह विविध विभागाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

यांचा झाला सत्कार…

राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त विविध उपक्रमात भाग घेतलेल्या रांगोळी स्पर्धा प्रथम क्रमांक मिळविलेल्या वैष्णवी राजपूत, द्वितीय क्रमांक भाग्यश्री चव्हाण, तृतीय क्रमांक हिना खाटीक यांचा तर निबंध स्पर्धेत प्रिती शिरसाठ, जिनल तांबोळी, जयश्री पाडवी, वक्तृत्व स्पर्धेत वैभव पाटील, मोहित पाटील, नंदीनी जाधव, चित्रकला स्पर्धत पीयुष निकवाडे, रोशनी पवार, कबीर जाधव या विजेत्या झालेल्या विद्यार्थी व विद्यार्थींनींचा मान्यवराच्या हस्ते प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला. तर उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांना प्रमाणपत्र व पुष्‍पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला. यावेळी नवमतदारांना ई-पीक अर्थात इलेक्ट्रॉनिक ओळखपत्राचे वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. जिल्हाधिकारी खत्री यांनी राष्ट्रीय मतदार दिवसानिमित्त सामुहिक प्रतिज्ञापत्राचे वाचन केले.

हेही वाचा:

The post राष्ट्रीय मतदार दिन: लोकशाहीच्या बळकटीसाठी सजग राहून मतदान करा - जिल्हाधिकारी मनीषा खत्री appeared first on पुढारी.