राष्ट्रीय युवा दिन विशेष : विवेकानंदांच्या विचारांसाठी रूपेशचा ध्यास

रूपेश बाविस्कर www.pudhari.news

नाशिक : दीपिका वाघ
स्वामी विवेकानंदाच्या विचारांनी तरुणांना प्रेरित करण्यासाठी 12 जानेवारी हा दिवस 1984 पासून ‘राष्ट्रीय युवा दिन’ म्हणून साजरा केला जातो. नाशिक जिल्हा परिषदेतील आरोग्य विभागातील रूपेश बाविस्कर 2013 पासून स्वामी विवेकानंदांचे विचार युवकांपर्यंत पोहोचवण्याचे काम करत आहेत. त्यासाठी एक घटना कारणीभूत ठरली आणि आजही हे कार्य अविरतपणे सुरू आहे.

शहरी भाग आणि ग्रामीण, आदिवासी भागातील दरी कायम आहे. शहरातील युवकाला सर्व सोयीसुविधा मिळतात पण ग्रामीण भागातील युवक वंचित राहतात. देशाच्या स्वप्नातील युवक शहरी भागात वसलेला आहे. राजकारण, अभिनय, व्यवसाय, क्रीडा अशा अनेक क्षेत्रांत युवकांनी देशाला अभिमान वाटेल अशी कामगिरी करून दाखवली आहे. भारतात 65 टक्के लोकसंख्या तरुणांची असली तरी तरुणांच्या आत्महत्यांचे प्रमाण सर्वाधिक आहे. बोलण्यातून कुणाच्या आयुष्यात परिवर्तन होत असेल तर त्यावर आपण काम का करू नये, असे बाविस्कर यांना वाटले आणि कामाला सुरुवात झाली. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन, बालक-पालक-शिक्षक संबंध, योग व ध्यान शिबिर घेऊन योगाचा प्रसार व प्रचार करणे, रेकी व डाउझिंग कार्यशाळा, माइंड पॉवर कार्यशाळा, व्यक्तिमत्त्व विकास कार्यशाळा, आकर्षणाचा सिद्धांत यावर कार्यशाळा, ताणतणाव व्यवस्थापन व आंतरवैयक्तिक संबंधावर मार्गदर्शन, पती-पत्नी संवाद कार्यशाळा अशा विविध विषयांवर ते मार्गदर्शन करतात. नोकरी सांभाळून महाराष्ट्रातील विविध भागांत स्वखर्चाने जाऊन ते युवकांना मार्गदर्शन करण्याचे काम करतात. आजवर बाविस्कर यांना महाराष्ट्रातून अनेक पुरस्कारांनी गौरवण्यात आले आहे.

अशी मिळाली प्रेरणा
मित्र डिप्रेशनमध्ये गेला होता. त्याच्या आयुष्यात खूप नकारात्मकता होती. माझी बदली चिंचओहोळ (त्र्यंबकेश्वर) गावी होती. नेटवर्कमुळे आमचा संपर्क होऊ शकला नाही आणि एक दिवस त्यांनी आत्महत्या केल्याचे समजले. आमचा संपर्क झाला असता तर त्याला मदत करू शकलो असतो आणि तो आज जिवंत असता, अशी जाणीव सतत होत राहते. तेव्हापासून मी ग्रामीण भागातील, आदिवासी पाड्यावरील युवकांपर्यंत स्वामी विवेकानंदांचे विचार पोहोचवण्याचे काम करत आहे.

हेही वाचा:

The post राष्ट्रीय युवा दिन विशेष : विवेकानंदांच्या विचारांसाठी रूपेशचा ध्यास appeared first on पुढारी.