रासाकापाठोपाठ निसाकाचे शिवधनुष्य उचलणार
निफाडचे आमदार दिलीप बनकर यांची ग्वाही
पिंपळगाव बसवंत (जि. नाशिक) : वाघ, बोरस्ते यांच्यासह कर्मवीरांच्या त्यागातून उभ्या राहिलेल्या साखर कारखान्याने निफाड तालुक्याला सुजलाम सुफलाम केले. दृष्ट लागली अन् दोन्ही साखर कारखान्यांच्या चुली विझल्या. ऊस उत्पादक व कामगारांच्या आयुष्यातील अंधार दूर करण्यासाठी रासाका चालविण्यासाठी घेऊन मी अग्निपरीक्षा देत आहे. शेतकऱ्यांची दैना दूर करण्यासाठी मी आर्थिक नुकसानीची पर्वा करणार नाही. रासाकापाठोपाठ निसाकाचेही शिवधनुष्य पेलून दोन्ही संस्थांना गतवैभव मिळवून दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, अशी ग्वाही आमदार दिलीप बनकर यांनी दिली.
(स्व.) अशोकराव बनकर पतसंस्थेच्या माध्यमातून आमदार दिलीप बनकर यांनी रासाका १५ वर्षांसाठी भाडेतत्त्वावर घेतल्यानंतर निफाड तालुक्यातील दिग्गज नेत्यांच्या उपस्थितीत रासाका कार्यस्थळावर काकासाहेब वाघ यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यासाठी झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. मविप्रच्या सरचिटणीस नीलिमाताई पवार, सभापती माणिकराव बोरस्ते, राजेंद्र डोखळे यांची प्रमुख उपस्थिती होती. आमदार बनकर म्हणाले, की निसाका-रासाकाला पुन्हा ती झळाळी देऊन शेतकऱ्यांचे अश्रू पुसण्याचा माझा प्रयत्न आहे. निवडणुकीत दिलेला शब्द पाळण्यासाठी मी शासनदरबारी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. माझ्या हाती कारभार असलेल्या पिंपळगाव बाजार समितीसह सर्वच संस्था यशोशिखरावर आहेत. तेच चित्र रासाकामध्ये येत्या काही वर्षांत दिसेल. रासाकाची क्षमता दोन हजार ५०० टनांपर्यंत वाढविणार असल्याचे त्यांनी नमूद केले.
निसाका अभी बाकी है...
‘रासाका तो झाकी है, निसाका अभी बाकी है... ’अशी भीमगर्जना आमदार बनकर यांनी या वेळी केली. रासाका घेताना मतदारसंघातील एका नेत्याने खोडा घातला. बाहेरच्या संस्थेला पाठबळ दिल्यामुळे रासाका प्रतिटन २० रुपये अधिक दराने घ्यावा लागला. त्यामुळे शेतकऱ्यांचे दर वर्षी एक कोटी रुपयांचे नुकसान होणार आहे. निसाकाबाबत प्रश्न उपस्थित करणारे राजकारण करीत आहेत. निसाका यापूर्वीच भाडेतत्त्वावर दिला आहे. त्यातूनही राज्य शासनाच्या माध्यमातून मार्ग काढू. पुढील उद्दिष्ट निसाकाच असेल. निफाड तालुक्याचा वनवास संपविण्यासाठी मी आर्थिक झळ घेण्यास तयार असल्याचे त्यांनी नमूद केले.
हेही वाचा - अख्खे गाव हळहळले! दोन सख्ख्या बहिणींच्या एकत्रच निघाल्या अंत्ययात्रा; पाच मुलांमधून आता तिघांचाच आधार
गटातटाची बांधली मोट...
रासाका भाडेतत्त्वावर घेण्यात आमदार बनकर यांनी एका चालीत अनेक दिग्गज नेत्यांना चेकमेट केले. निफाड तालुक्यात पक्षापेक्षा गटातटाचे राजकारण अधिक धारदार आहे. वाघ यांच्या पुतळ्यास अभिवादनाचा कार्यक्रम ही इष्टापत्ती समजून आमदार बनकर यांनी सर्व पक्ष, गटतटाच्या नेत्यांची मोट आज बांधल्याचे उपस्थितीवरून दिसून आले. माजी आमदार नानासाहेब बोरस्ते, नितीन ठाकरे, तानाजी बनकर, विश्वास मोरे, डी. बी. मोगल, पंढरीनाथ थोरे, शंकर कोल्हे, दत्तात्रय डुकरे, हंसराज वडघुले, रमेश घुगे, शिवाजी ढेपले, जगन कुटे, राजाभाऊ शेलार, विलास मत्सागर, राजेंद्र मोगल, अजिंक्य वाघ, विलास वाघ, सुरेश कमानकर, सिद्धार्थ वनारसे, सुभाष कराड, बाबासाहेब शिंदे, माधवराव ढोमसे, धनंजय भंडारे, सचिन वाघ आदींसह (स्व.) बनकर पतसंस्थेचे अध्यक्ष रामभाऊ माळोदे, सोहनलाल भंडारी, बाळासाहेब बनकर, विलास बोरस्ते, गणेश बनकर आदी उपस्थित होते.
गावागावांत जल्लोषात स्वागत...
रासाका सुरू होणे हा निफाडच्या अर्थकारणाला पूरक निर्णय झाल्याने गावागावांत जल्लोष झाला. पिंपळगाव येथून ढोल-ताशांच्या गजरात निघालेल्या रॅलीचे लोणवाडी, दावचवाडी, कुंदेवाडी, नांदुर्डी, रानवड येथे फटाक्यांची आतषबाजी करून जोरदार स्वागत झाले. ठिकठिकाणी आमदार बनकर यांचा सत्कार करण्यात आला.
हेही वाचा - "माझी चिमुरडी उपाशी असेल हो.." चिमुकलीचा लागेना थांगपत्ता; मातेचा आक्रोश