नाशिक (वणी) : पुढारी वृत्तसेवा
दिंडोरी तालुक्यातील वणी नांदुरी रस्त्यावरील पायरपाडा येथील रामवाडी वस्ती येथे सोमवार (दि.१८) सकाळी दहा वाजेच्या दरम्यान ढवळू कृष्णा गवळी यांच्या घराला आग लागून जवळपास ३ लाख ५० हजाराचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
वणी नांदुरी रस्त्यावरील पायरपाडा येथे सकाळी एका घरातून मोठ्या प्रमाणात धूराचे लोट दिसु लागल्याने रहिवाशांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. कुडाचे घर असल्याने आगीने लगेच पेट घेतला होता. घरातील कपडे कागदपत्रे व संसारोपयोगी वस्तू जळून गेल्या असून शेजारील घरालाही आगीची झळ बसली आहे. खेडेगाव असल्याने सोयीसुविधाअभावी आग विझवण्यात मोठ्या अडचणींना सामाेरे जावे लागले. तर परिसरातील रहिवाशांनी जवळच असलेल्या शेतातील विहिरीवरील पाण्याची मोटर सुरु करून आग विझवण्यात आली. आगीत घरातील जवळपास सहाशे सात गव्हाचे पोते व दोन बाजरीचे पोते होते तसेच काही सोन्याचे दागिने व रोख स्वरूपात पन्नास हजार रूपये घरात होते. सर्व आगीत भस्मसात झाल्याने कुटुंबाचे मोठे नुकसान झाले आहे. घरातील व्यक्ती सकाळी शेतात कामावर गेले होते. त्यामुळे राहत्या घराला आग लागल्याचे उशीरा कळाले. या घटनेची माहीती कामगार तलाठी पालवी, अहिवंतवाडी ग्रामसेवक देशमुख यांना देण्यात आली आहे. तलाठी यांनी घटनेचा पंचनामा केला असून यात जवळपास ३ लाख ५० हजाराचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. आग नेमकी कोणत्या कारणामुळे लागली याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. ग्रामसेवक यांनी घटनेची पाहणी केली असून आग विझवण्यासाठी विठ्ठल भरसट, राजेश गवळी, धनराज ठाकरे, लक्ष्मण गवळी, पोपट पवार व ग्रामस्थांनी मोठ्या शर्थीच्या प्रयत्नाने आग विझवली. तर कुटुंबाचे मोठे नुकसान झाल्याने आर्थिक सहाय्य मिळावी अशी मागणी होत आहे.
The post राहत्या घराला आग लागून लाखोंचे संसारोपयोगी वस्तू जळून खाक appeared first on पुढारी.