पुढारी ऑनलाइन डेस्क- काँग्रेसचे नेते खा. राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा नाशिकमध्ये पोहचली आहे. या यात्रेत राहुल गांधी यांच्यासोबत हजारो कार्यकर्ते सहभागी झाले आहेत. नाशिकमध्ये शालिमार चौकात त्यांची सभा व रोड शो होणार आहे. दरम्यान आघाडीच्या तीनही पक्षांच्या वतीने त्यांचे नाशिक नगरीत जोरदार स्वागत करण्यात आले आहे.
भारत जोडो न्याय यात्रा आज गुरुवार (दि. १४) दुपारी शहरात दाखल झाली. बुधवारी (दि. १३) मालेगाव येथे रोड शो व चौक सभा घेतल्यानंतर सौंदाणे येथे खा. गांधी यांनी मुक्काम केला. त्यानंतर आज सकाळी चांदवड येथील सभा आटोपून ते पिंपळगाव बसवंत, ओझर मार्गे शहरात दाखल झाले. त्यापार्श्वभूमीवर नाशिक शहरात शेकडो पोलिसांचा फौजफाटा तैनात आहे. त्यांची यात्रा अंतिम टप्प्यात आली असून 16 मार्चला या यात्रेचा समारोप होणार असून यात्रा शिवाजी पार्कवर जाणार असून तेथे राहुल गांधी यांची जाहीर सभा होणार आहे.
आली होती, बॉम्बने उडवून देण्याची धमकी
काही दिवसांपूर्वी राहुल गांधी यांना राजीव गांधी यांच्याप्रमाणे बॉम्बने उडवून देण्याची धमकीचा कॉल नाशिक पोलिस आयुक्तालयात आला होता. त्यामुळे पोलिस दलात खळबळ उडाली होती. दरम्यान ती पार्श्वभूमी लक्षात घेता आज शेकडो पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. यामध्ये..यामध्ये पोलिस उपायुक्त, सहायक पोलिस आयुक्तांसह १०० पोलिस अधिकारी, ६०० पोलिस अंमलदार, १०० महिला अंमलदार, गुन्हे शाखेची तीन पथके, जलद प्रतिसाद पथक, राज्य राखीव पोलिस दल, दंगल नियंत्रण पथक, वाहतूक शाखेमधील पोलिसांचा फौजफाटा बंदोबस्तासाठी तैनात आहे.
The post राहुल गांधी यांची यात्रा नाशिक शहरात पोहचली, हजारो कार्यकर्ते सहभागी appeared first on पुढारी.