रिक्त जागांच्या आकृतिबंधाला मंजुरी मिळावी; महापौरांची भुजबळांकडे मागणी

नाशिक : शहराची लोकसंख्या वाढत असताना त्या तुलनेत महापालिकेत कर्मचारी नसल्याने शासनाकडे प्रलंबित असलेल्या रिक्त जागांच्या आकृतिबंधाला मंजुरी मिळावी, अशी मागणी महापौर सतीश कुलकर्णी यांनी पालकमंत्री छगन भुजबळ यांच्याकडे केली. 

महापालिकेत दोन हजारांहून अधिक पदे रिक्त आहेत. त्याव्यतिरिक्त शहराची लोकसंख्या वाढत असल्याने अधिक कर्मचाऱ्यांची गरज आहे. पालिकेचा यापूर्वी सात हजार ९० पदांचा आकृतिबंध मंजूर आहे. परंतु, सद्यःस्थितीत पालिकेचा समावेश ‘ब’ वर्गात झाल्याने त्यानुसार चौदा हजार पदांचा नवा आकृतिबंध शासनाला सादर करण्यात आला आहे. कर्मचारी कमतरतेमुळे महापालिकेच्या कामकाजावर परिणाम होत आहे. घरपट्टी व पाणीपट्टी वसुलीसाठी कर्मचारी उपलब्ध नसल्याने वसुलीवर परिणाम होत आहे. शासनाकडे तीन वर्षांपासून आकृतिबंध प्रलंबित आहे. त्यास मंजुरी मिळावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली. आकृतिबंध मंजुरीसंदर्भात नगरविकासमंत्र्यांशी चर्चा करण्याचे आश्‍वासन श्री. भुजबळ यांनी दिले. सभागृहनेते सतीश सोनवणे, गटनेते जगदीश पाटील आदी उपस्थित होते. 

हेही वाचा > सिनेस्टाइल पाठलाग! खंडणीची मागणी करणारा पोलीसांकडून ट्रेस; पोलिसांत गुन्हा दाखल

हेही वाचा > हॉटेल मालकाने बळजबरीने ग्राहकाकडून घेतला ८० हजारांचा ऐवज; मालकावर गुन्हा दाखल