रिक्षाचालकाचा मित्रांनीच काढला काटा, पुण्यातून चौघांना अटक

रिक्षाचालकाचा खून नाशिक

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- मेरी रासबिहारी लिंकरोडवरील औदुंबर लॉन्सजवळील मोकळ्या रिक्षाचालक जागेत प्रशांत अशोक तोडकर (२८, रा. आदर्शनगर, रामवाडी) याचा खून करण्यात आला. याप्रकरणी गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने तपास करीत पिंपरी चिंचवड परिसरातून चाैघा संशयितांना अटक केली आहे. मित्रांनीच शाब्दिक वादातून प्रशांतचा खून केल्याचे समोर उघड झाले.

विजय दत्तात्रय आहेर (३०, रा. रामवाडी), संकेत प्रदिप गोसावी (२६, रा. जुईनगर, म्हसरुळ), प्रशांत निंबा हादगे (२९, रा. पेठरोड), कुणाल कैलास पन्हाळे (३०, रा. दिंडोरी रोड) अशी पकडलेल्या संशयितांची नावे असल्याची माहिती, पोलिस उपआयुक्त प्रशांत बच्छाव, सहायक आयुक्त संदिप मिटके यांनी पत्रकार परिषदेत दिली.

  • संशयित आरोपी विजय आहेर व प्रशांत तोडकर यांच्यात काही दिवसांपुर्वी शाब्दिक वाद झाले हाेते.
  • शनिवारी दोघांमध्ये पुन्हा वाद झाल्याने विजय व इतर साथिदारांनी मिळून प्रशांतला मारहाण करीत त्याच्या डोक्यात दगड टाकून खून केला.
  • त्यानंतर चौघेही फरार झाले.

नेमकी काय आहे घटना?

रविवारी (दि.१६) सकाळी नऊच्या सुमारास मोकळ्या जागेत प्रशांत तोडकर याचा मृतदेह आढळून आला. मारेकऱ्यांनी प्रशांतच्या डोक्यात दगड मारून खून केल्याचे उघड झाले. याप्रकरणी योगेश तोडकर (३४, रा. आदर्श नगर) यांच्या फिर्यादीनुसार म्हसरुळ पोलिस ठाण्यात मारेकऱ्यांविरोधात खुनाचा गुन्हा दाखळ करण्यात आला. पोलिस तपासात प्रशांत हा शनिवारी (दि.१५) दिवसभर घरात होता. त्यानंतर रात्री रिक्षा घेऊन तो घराबाहेर पडला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी त्याचा मृतदेह आढळून आला.

अन् चौघेही आले जाळ्यात

त्यामुळे पोलिसांनी रात्री प्रशांत कोणाकोणाला भेटला. घटनास्थळासह परिसरातील सीसीटीव्ही तपासले. त्यात पोलिसांनी मारेकऱ्यांची ओळख पटवली. गुन्हे शाखा युनिट एकचे पोलिस निरीक्षक मधुकर कड यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक हेमंत तोडकर, उपनिरीक्षक रवींद्र बागुल, हवालदार प्रविण वाघमारे, विशाल काठे, नाझीमखान पठाण, पोलिस नाइक विशाल देवरे, किरण शिरसाठ, प्रशांत मरकड, विशाल चारोस्कर यांच्या पथकाने तपास करीत संशयितांचा माग काढला. त्यात चौघेही पिंपरी चिंचवड येथे असल्याचे समजल्याने पथक त्यांच्या मागावर गेले. पुणे येथील निगडी परिसरातील थरमॅक्स चौकातून चौघांना ताब्यात घेतले.

हेही वाचा –