रितेश ठाकूरविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा; शिक्षकभरतीतील मोठे रॅकेट उघड होण्याची शक्यता

नाशिक : राज्य आदिवासी विभाग रोजंदारी वर्ग तीन, चार कर्मचारी संघर्ष संघटनेचा अध्यक्ष रितेश ठाकूर याच्याविरोधात फसवणुकीचा पहिला गुन्हा सुरगाणा पोलिस ठाण्यात दाखल झाला आहे. त्यामुळे रितेशविरुद्ध पोलिस कारवाईचा फास आणखी आवळला जाणार असून, आदिवासी विकास विभागातील शिक्षकभरतीतील मोठे रॅकेट उघड होण्याची शक्यता आहे.

रितेश ठाकूरविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा 

पोलिसांनी संशयित रितेशच्या दोन साथीदारांनादेखील ताब्यात घेतले आहे. 
राज्यातील शासकीय आश्रमशाळांवर वर्षानुवर्षे रोजंदारीवर शिक्षक म्हणून काम करणाऱ्या रितेश ठाकूर याने राज्यातील रोजंदारी कर्मचाऱ्यांना एकत्र करत संघटना स्थापून संघटनेच्या माध्यमातून या सर्वांच्या मदतीने रोजंदारी कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेत सामावून घेण्यासाठी अनेक आंदोलने केली. २०१९ मध्ये भाजप सरकारने आंदोलनाची दखल घेत आदिवासी विकास विभागात विशेष भरतीप्रक्रिया राबविली. 

कारवाईचा फास आवळणार; रॅकेट उघडकीस येणार 
या वेळी रितेश ठाकूर याने विजय बागूल व राजाराम बागूल या आपल्या दोन साथीदारांच्या सहाय्याने नोकरीत कायम करून देण्याचे आमिष दाखवीत राज्यातील अनेक रोजंदारी कर्मचाऱ्यांकडून पैसे मागितले. रितेश ठाकूर याच्यावर विश्‍वास ठेवत जिल्ह्यातील सुरगाणा येथील चंद्रकांत गावित या रोजंदारी कर्मचाऱ्यासह जिल्ह्यातील ३६ रोजंदारी कर्मचाऱ्यांकडून सुमारे ४४ लाख ६० हजार रुपये रितेश व त्याच्या साथीदारांना दिले. 

हेही वाचा> बहिणीपाठोपाठ भावाची उत्तुंग कामगिरी! एकाच आठवड्यात सुराणा कुटुंबाला जणू जॅकपॉट 

 शिक्षकभरतीतील मोठे रॅकेट उघड होण्याची शक्यता
२०१९ मध्ये भरतीप्रक्रियेत काम न झाल्याने पैसे दिलेल्या जिल्ह्यातील सर्व रोजंदारी कर्मचाऱ्यांनी त्याच्याकडे पैशासाठी तगादा लावला. मात्र, त्याने पैसे देण्यास टाळाटाळ केली. यामुळे आपली सर्वांची फसवणूक झाल्याचे गावित यांना कळताच त्यांनी सुरगाणा पोलिस ठाण्यात गुरुवारी त्याच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. 

रॅकेट उघड होणार 
कोट्यवधींची माया रितेशने जमविल्याचा आरोपही तक्रारदारांकडून होत आहे. त्यामुळे ज्या कर्मचाऱ्यांना आता आपली फसवणूक झाली आहे त्यांच्याकडून आता त्याच्याविरुद्ध पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल होणार आहेत. मात्र, या सर्व प्रकरणातून भरतीप्रकरणी मोठे रॅकेट उघड होणार आहे. 

शहरात उल्लंघन, ग्रामीणमध्ये फसवणूक 
छत्रपती सेनेने यात पुढाकार घेत फसवणूक झालेल्यांना न्याय मिळवून देण्याच्या हेतूने विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ. प्रताप दिघावकर यांची भेट घेत या प्रकरणी न्याय देण्याची विनंती केली. श्री. दिघावकर यांच्या सूचनेनंतर ग्रामीण पोलिस प्रशासन कामास लागले असून, सुरगाणा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. सद्यःस्थितीत रितेश विनापरवानगी नाशिक शहर हद्दीत पदयात्रा, जमावबंदी आणि २०१९ मध्ये परीक्षा केंद्रात तोडफोड करत शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी मुंबई नाका पोलिस ठाण्याच्या ताब्यात आहे. न्यायालयाने त्याला दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. 

हेही वाचा> काय सांगता! विवाह आणि तो ही फक्त ५१ रुपयांत; कोणीही मोहिमेत होऊ शकतं सहभागी  

नोकरीचे आमिष दाखवून ज्यांची फसवणूक केली आहे, त्या सर्वांना न्याय मिळावा म्हणून पाठपुरावा करत आहोत. यात आम्हाला यश येत असून, पहिला गुन्हा दाखल झाला आहे. आता रितेश ठाकूरच्या मालमत्तेची संपूर्ण चौकशी करत फसवणूक झालेल्यांना पोलिस प्रशासनाने न्याय द्यावा. 
-तुषारी गवळी