”रिव्‍हॉल्व्हर ऑफ ऑनरची पहिली मानकरी मी ‘शुभांगी’!” पहिल्याच प्रयत्नात पोलिस उपनिरीक्षकपदासाठी निवड

नाशिक : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घोषणेनंतर पहिल्यांदाच मला रिव्‍हॉल्व्हर ऑफ ऑनरची पहिली मानकरी होण्याचा जो सन्मान मिळाला आहे तो माझ्या आयुष्यासाठी फार मोठा आहे. आज मी माझ्या गावातील पहिलीच फौजदार होणारी कन्या असून, बघितलेल्या स्वप्नांची पहिल्याच प्रयत्न एक पायरी यशस्वीरीत्या पार केल्याचा माझा आनंद गगनात मावेनासा झाला आहे... हे बोल आहेत महाराष्ट्र पोलिस अकादमीतील प्रशिक्षणार्थी पोलिस उपनिरीक्षक ११८ व्या तुकडीच्या ८८८ प्रशिक्षणार्थींमधून रिव्हॉल्व्हर ऑफ ऑनरची पहिली मानकरी ठरलेली शुभांगी शिरगावे यांचे. 

रिव्‍हॉल्व्हर ऑफ ऑनरची पहिली मानकरी मी ‘शुभांगी’!
मुघलशाहीत सर्वधर्मसमभावाची शिकवण देणारा सरदार अब्दुल लाट अन्‌ सध्याचे नॅशनल ह्यूमन राइट्स् कमिशनचे सदस्य ज्ञानेश्‍वर मुळे यांच्या अब्दुल लाट (ता. शिरोळ, जि. कोल्हापूर) गावची मी शेतकरी कन्या. वडील चंद्रकांत शेतकरी, तर आई माणिक गृहिणी. मी घरात सर्वांत मोठी. भाऊ अक्षय, अमर आणि लहानगी सारिका असे आमचे कुटुंब. प्राथमिक शिक्षण गावातच, तर पदवीचे शिक्षण विवेकानंद महाविद्यालय कोल्हापूर येथे घेतले. कोल्हापूर अन्‌ परिसरात तशी खाकीची क्रेझ. समाजातील वातावरण सातच्या आत घरात...नाही ती सामाजिक बंधने, त्यातून बदलणारे वातावरण व कुटुंबाची होणारी घालमेल यात आपण काहीतरी बदल करावा, असे लहानपणापासून वाटत होते. पदवीचे शिक्षण घेत असताना परिसरात असलेल्या खाकीच्या क्रेझने आपसूकच फौजदार होण्याचे स्वप्न पाहिले आणि पहिल्याच प्रयत्नात पोलिस उपनिरीक्षकपदासाठी निवड झाली.

हेही वाचा > दुसऱ्या लाटेत कोरोनाने बालकांना घेरले! हृदय, मेंदूवर आघात होत असल्याची बाब उघड

व्हिडिओ बाहेर येऊन आम्‍हाला जो डाग लागला त्याचे दु:ख

प्रशिक्षणासाठी पोलिस अकादमीत आले. कोविडचा काळ सुरू झाला. प्रशिक्षणावर बंधने येऊ लागली. मात्र महाराष्ट्र पोलिस प्रबोधिनीच्या संचालिका अश्‍वती दोर्जे यांनी पंधरा महिन्यांचे प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण केले. कठीण काळात प्रशिक्षण पूर्ण करून घेणे हे आव्हान असताना त्यांनी आमच्याकडून पूर्ण करून घेतल्याचा आम्हाला अभिमान आहे. आम्ही शेवटच्या दिवशी जो आनंद व्यक्त केला अन्‌ त्याचा व्हिडिओ बाहेर येऊन आम्‍हाला जो डाग लागला त्याचे दु:ख मात्र आम्हाला आहे, असे शुभांगी शिरगावे यांनी सांगितले. 

हेही वाचा > भुजबळांची बिअर बारमध्ये धाड! बिल न देताच मद्यपींचा पोबारा; दिवसभर चर्चेला उधाण 

१८ पैकी ११ अॅवॉर्डची मानकरी 
ए. के. ध्रुव अॅवॉर्ड पेपर क्रमांक १० व ११, जे. के. अकुत पेपर क्रमांक १ ते ४, डी. एस. राजे अॅवॉर्ड १ ते ४, वाय. आर. प्रधान अॅवॉर्ड, आयपीसी आणि मॅन्युअल, डी. एल. मानगुलकर बेस्ट ऑलराउंडर कॅडेट, डॉ. बी. आर. आंबेडकर बेस्ट कॅडेट इन लॉ, सावित्रीबाई फुले बेस्ट कॅडेट इन वुमन, यशवंतराव चव्हाण बेस्ट ऑल राउंड कॅडेट इन बॅच, इनडोअर प्रथम, सर्वोत्कृष्ट प्रशिक्षणार्थी, अहिल्याबाई होळकर बेस्ट वुमन कॅडेट. 

अब्दुल लाटच्या शुभांगी शिरगावे यांची प्रशिक्षणात अष्टपैलू कामगिरी 

मुलीने मिळविलेले यश कौतुकास्पद नव्हे तर आमच्यासाठी अभिमानास्पद आहे. आज आम्ही नाशिकला येऊनदेखील मुलीचा आनंद बघू शकलो नाही, याची खंत आहे. 
-चंद्रकांत व माणिक शिरगावे (शुभांगीचे वडील व आई)