रुग्णांना शोधावी लागते खड्ड्यांतून वाट! समृद्धी कामामुळे रस्त्याची दुरवस्था 

सिन्नर (जि. नाशिक) : राज्य शासनाचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असणाऱ्या समृद्धी महामार्गाचे काम अतिशय वेगात सुरू आहे. राज्याच्या प्रगतीची कवाडे खुली करणाऱ्या या महामार्गाच्या कामामुळे ग्रामीण भागात रस्त्यांची मात्र दुरवस्था झाली आहे.

सिन्नर तालुक्यातील वावी येथे आरोग्य केंद्राकडे जाणाऱ्या रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य असून, रुग्णांना खड्डे चुकवत दवाखान्यापर्यंत मार्गक्रमण करावे लागत आहे. या रस्त्याची तातडीने दुरुस्ती करून रुग्णांचा जीवघेणा प्रवास थांबवावा, अशी मागणी होत आहे. 

वावी-घोटेवाडी रस्त्यावर वावीपासून काही अंतरावरच प्राथमिक आरोग्य केंद्र आहे. या केंद्राला परिसरातील ४० गावे जोडलेली असल्याने येथे नेहमीच रुग्णांचा राबता असतो. शिर्डी महामार्गावरील साईभक्त निवासापासून आरोग्य केंद्राकडे जाणाऱ्या रस्त्यावरून समृद्धी महामार्गाच्या कामावरील अवजड वाहनांची सतत ये-जा असते. परिणामी, या संपूर्ण रस्त्याची अवस्था बिकट झाली आहे. वाहने लावताना उडणाऱ्या धुळीचा त्रास दोन वर्षांपासून निमूटपणे सहन करावा लागत आहे. या रस्त्यालगत जिल्हा परिषद शाळा व माध्यमिक विद्यालय असल्याने तेथील विद्यार्थ्यांना नेहमीच जीव धोक्यात घालून रस्ता ओलांडावा लागतो. तर आरोग्य केंद्राकडे जाणाऱ्या रुग्णांनाही जीवघेणा प्रवास करावा लागत आहे. ओरड केल्यावर रस्त्यावरील खड्डे बुजविण्यासाठी समृद्धी ठेका घेतलेल्या दिलीप बिल्डकॉन कंपनीकडून माती आणि मुरूम टाकला जातो. मात्र, हे काम वरवरचे असल्याने पुन्हा त्याच त्रासाला विद्यार्थी, रुग्णांना सामोरे जावे लागते. समृद्धी कामावर देखरेख करणाऱ्या यंत्रणेने रुग्णांची फरफट करणाऱ्या रस्त्याची तातडीने दुरुस्ती करावी, अशी मागणी होत आहे. 

हेही वाचा - झटपट श्रीमंतीच्या मोहात तरुणाई गुन्हेगारीकडे! द्राक्षनगरीत फोफावतेय भाईगीरीचे वेड

वावी येथे असलेल्या समृद्धी ठेकेदाराच्या कॅम्पमधून रोज शेकडो वाहने ये-जा करत असतात. त्यामुळे रस्त्याचे नुकसान होऊन याचा फटका विद्यार्थी व रुग्णांना बसत आहे. घोटेवाडीपर्यंत या रस्त्याची अवस्था बिकट आहे. मागणी करूनही रस्त्याची योग्यप्रकारे डागडुजी केली जात नाही. किमान दवाखान्यापर्यंत जाणारा रस्ता तरी सुस्थितीत असणे आवश्यक आहे. 
- दीपक वेलजाळी, उपतालुकाप्रमुख, शिवसेना 

ग्रामपंचायतमार्फत दिलीप बिल्डकॉनला रस्ता दुरुस्तीच्या सूचना करण्यात आल्या आहेत. रुग्णांची गैरसोय होऊ नये, यासाठी आरोग्य केंद्रापर्यंत मुरमाचे अस्तरीकरण करून घेण्यासह धुळीचा त्रास होऊ नये म्हणून रस्त्यावर पाणी मारण्यास सांगितले आहे. 
- कन्हय्यालाल भुतडा, सरपंच, वावी 
 

हेही वाचा - एक विलक्षण प्रेम! बाभळीच्या झाडात अडकलेल्या साथीदारासाठी लांडोराची घालमेल; पाहा VIDEO