रुग्णालयांची कारणे संपता संपेनात! व्हेंटिलेटरसाठी थेट पालकमंत्र्यांच्या कार्यालयाला घालावे लागतंय लक्ष

नाशिक : कोरोनाग्रस्त रुग्णांच्या संख्येत वाढ होत असताना, ‘एचआरसीटीचा स्कोर’ आठ ते दहापर्यंत असलेल्या रुग्णांच्या नातेवाइकांना व्हेंटिलेटरसाठी नाशिकमध्ये धावाधाव करावी लागत आहे. रुग्णालयांचे व्यवस्थापन आणि यंत्रणांमधील समन्वयाच्या अभावामुळे एकीकडे खाटांची संख्या वाढत असताना, गैरसोय का संपत नाही, असा प्रश्‍न शहरवासीयांना भेडसावू लागला आहे. त्यातच व्हेंटिलेटरसाठी पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या कार्यालयाला लक्ष घालण्याची वेळ आली आहे. मात्र, रुग्णालयांची कारणे संपता संपत नसल्याचे विदारक चित्र शहरात नातेवाइकांना ‘याचि डोळा, याचि देही’ अनुभवायला मिळत आहे. 

व्हेंटिलेटरची आवश्‍यकता असल्याचे एका रुग्णाच्या नातेवाइकांना दुपारी पंचवटीतील खासगी रुग्णालयातून सांगण्यात आले. त्यानंतर नातेवाइकांची धावाधाव सुरू झाली. नाशिक महापालिकेच्या डॅशबोर्डवर उपलब्ध माहितीच्या आधारे संपर्क साधण्यात आला. त्याचक्षणी शहरात कुठेही व्हेंटिलेटर खाट उपलब्ध नसल्याचे सांगत व्हेंटिलेटरची आवश्‍यकता असलेल्या रुग्णाची माहिती नोंदवून घेण्यात आली. एवढेच नव्हे, तर व्हेंटिलेटर उपलब्ध होईल, तसे कळविले जाईल, असे सांगत असताना, तुम्हीही व्हेंटिलेटर खाट कुठे उपलब्ध आहे काय? याची माहिती घ्या, असे सूचविण्यात आले. 

हेही वाचा - महिलांनो सावधान! तुमच्या फेक अकाऊंटवरून पुरुषांना ब्लॅकमेलिंग; सायबर भामट्यांचा नवा प्रकार

खासगी रुग्णालयांची कारणे 

महापालिकेच्या संपर्क क्रमांकावरून मिळालेल्या माहितीच्या आधारे ‘डॅशबोर्ड’वरील माहितीच्या आधारे नातेवाइकांनी संपर्क सुरू केल्यावर खासगी रुग्णालयांकडून कारणांमागून कारणे सांगण्यास सुरवात केली. पंचवटीतील रुग्णालयात डॅशबोर्डवर व्हेंटिलेटर शिल्लक असल्याने रुग्णाला कधी आणू, अशी विचारणा केली. त्यावर ऑक्सिजन मिळत नाही, असे रुग्णालयातून सांगण्यात आले. त्याचक्षणी ऑक्सिजन उपलब्ध करू का, अशी विचारणा नातेवाइकांनी केल्यावर आम्ही ‘सेटल पेशंट’ घेतोय असे उत्तर मिळाले. त्यानंतर शहरातील दुसऱ्या खासगी रुग्णालयात संपर्क साधण्यात आला. दोन व्हेंटिलेटर शिल्लक आहेत, हे लक्षात आणून देताच, नातेवाइकांना त्या व्हेंटिलेटरसाठी ‘ॲडमिशन’ झालंय, असे उत्तर रुग्णालयातून मिळाले. तिसऱ्या रुग्णालयातून आमच्या रुग्णालयाच्या सगळ्या खाटा मोकळ्या दिसत असतील. कारण आमचे रुग्णालय बंद आहे, अशी माहिती देण्यात आली. नाशिक रोड भागातील एका रुग्णालयात व्हेंटिलेटर शिल्लक दिसत असतानाही आमच्याकडे शिल्लक नाही, असे उत्तर नातेवाइकांना मिळाले. 

सॉफ्टवेअरचा ‘प्रॉब्लेम’ 

शहरातील एका रुग्णालयाने कळस गाठला. महापालिकेच्या ‘डॅशबोर्ड’वर व्हेंटिलेटर उपलब्ध आहे, हे लक्षात आणून दिल्यावर त्या रुग्णालयातून सॉफ्टवेअरचा ‘प्रॉब्लेम’, असे सांगत वेळ मारून नेण्यात आली. शहरातील आणखी एका रुग्णालयात दोन व्हेंटिलेटर उपलब्ध असल्याचे ‘डॅशबोर्ड’वर दिसते म्हटल्यावरही त्या रुग्णालयाने आमच्याकडे शिल्लक नाही, असे नातेवाइकांना सांगितले. 

हेही वाचा - देव तारी त्याला कोण मारी! तिसऱ्या मजल्यावरून पडूनदेखील चिमुरडी सुखरूप

रुग्णाने घेतला अखेरचा श्‍वास 

नाशिक शहरात चार तासांहून अधिक काळ प्रयत्न करूनही खासगी रुग्णालयांकडून व्हेंटिलेटर उपलब्ध होण्याचा प्रश्‍न सुटत नाही म्हटल्यावर पालकमंत्र्यांच्या कार्यालयाशी एका अत्यावस्थ रुग्णाच्या नातेवाइकांनी संपर्क साधला. कार्यालयातर्फे व्हेंटिलेटर खाटांसाठी माहिती घेत अखेर जिल्हा रुग्णालयात अत्यावश्‍यकता ध्यानात घेऊन व्हेंटिलेटर खाटेची व्यवस्था करण्यात आली. व्हेंटिलेटर उपलब्ध झाल्याचे समाधान रुग्णाच्या नातेवाइकांमध्ये असताना, रुग्णाला हलविण्यासाठी गेलेल्या नातेवाइकांना रुग्णाने अखेरचा श्‍वास घेतल्याचा धक्का बसला.