नाशिक : पुढारी वृत्तसेवा – रुग्ण हक्क सनद व दरपत्रक दर्शनी भागात न लावल्याने सिडकोतील पाच खासगी रुग्णालयांना महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने नोटिसा बजावल्या आहेत. सात दिवसांत समाधानकारक खुलासा न केल्यास कारवाई करण्याचा इशारा या रुग्णालयांना देण्यात आला आहे.
कोरोना महामारी काळात खासगी रुग्णालयांकडून होणारी रुग्ण आणि त्यांच्या नातेवाइकांची लूट रोखण्यासाठी तत्कालीन सरकारने रुग्णसेवेचे दर निश्चित करत दरपत्रक रुग्णालयात दर्शनी भागात लावण्याचे निर्देश रुग्णालयांना दिले होते. या नियमांची अंमलबजावणी बहुतांश रुग्णालयांनी केली. मात्र, कोरोना सरताच रुग्ण हक्क सनद व दरपत्रकाचा रुग्णालयांना विसर पडला. त्यामुळे महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने शहरातील सर्वच ६५० नोंदणीकृत रुग्णालयांना सूचनापत्र देत दरपत्रक व रुग्ण हक्क सनद दर्शनी भागात लावण्याचे निर्देश दिले होते. त्यानंतरही आदेशांची अंमलबजावणी होत नसल्यामुळे अखेर रुग्णालयांची तपासणी करण्याचा निर्णय वैद्यकीय विभागाने घेतला आहे. पहिल्या टप्प्यात शहरातील २० रुग्णालयांची तपासणी करण्यात आली. यात अनेक गंभीर बाबी आढळल्या होत्या. यात रुग्ण हक्क सदन व दरपत्रक दर्शनी भागात न लावणाऱ्या तीन रुग्णालयांना नोटिसा बजावण्यात आल्या होत्या. दुसऱ्या टप्प्यात शहरातील सिडको भागातील रुग्णालयांची तपासणी करण्यात आली. यात पाच खासगी रुग्णालयांनी रुग्ण हक्क सनद व दरपत्रक दर्शनी भागात लावले नसल्याचे आढळले. त्यामुळे या रुग्णालयांना कारणे दाखवा नोटिसा बजावण्यात आल्याची माहिती वैद्यकीय अधीक्षक डॉ. तानाजी चव्हाण यांनी दिली.
तक्रारीसाठी टोल फ्री क्रमांक
महाराष्ट्र नर्सिंग होम ॲक्टनुसार सर्व खासगी रुग्णालयांनी रुग्ण हक्क सनद व रुग्णसेवा दरपत्रक रुग्णालयाच्या दर्शनी भागात लावणे बंधनकारक आहे. या नियमाची अंमलबजावणी न केल्यास संबंधित रुग्णालयाविरोधात १८००२३३४२४९ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधून तक्रार नोंदवावी, असे आवाहन वैद्यकीय अधीक्षक चव्हाण यांनी केले आहे.
हेही वाचा: