रुपे बदलणाऱ्या विषाणू आणि गुन्हेगारीशी लढण्याचे पोलिसांचे शौर्य गौरवास्पद – मुख्यमंत्री

नाशिक : महाराष्ट्र पोलीस दलाला कर्तव्यदक्षतेचा समृद्ध वारसा आणि इतिहास लाभला आहे. आजच्या कोरोना संकटातही पोलिसांनी आपल्या कर्तव्यदक्षतेत कुठलीही तडजोड केलेली नाही. पदोपदी रूपं बदलणारा कोरोनाचा विषाणू आणि त्याच गतीने क्षणोक्षणी स्वरूप बदलणारी गुन्हेगारी ही महाराष्ट्र पोलीस दलासमोरची आजची मोठी आव्हाने आहेत, अशाही परिस्थितीत या दुहेरी संकटावर मात करण्यासाठी पोलिसांनी दाखवलेले धैर्य व शौर्य हे गौरवास्पद असल्याचे प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी केले आहे.

आज (ता. ३०) येथील महाराष्ट्र पोलीस अकादमीतील प्रशिक्षणार्थी पोलिस उप निरीक्षक 118 व्या सत्राच्याच्या दीक्षांत संचलन समारंभाच्या प्रसंगी दूरदृश्य प्रणालीद्वारे संबोधित करताना मुख्यमंत्री ठाकरे बोलत होते.

मुख्यमंत्री म्हणाले, कर्तव्यदक्ष व धैर्यवान पोलीसांची दीर्घ परंपरा महाराष्ट्राला लाभली आहे. अशा पोलीस दलात सहभागी होणाऱ्या प्रशिक्षणार्थी पोलीसांचे मी अभिनंदन करतो. तसेच आज पोलीस दलासमोर दिसणाऱ्या व न दिसणाऱ्या शत्रुंचे मोठे आव्हान असून एकीकडे आमचे पोलीस गडचिरोलीत नक्षलवाद्यांशी लढताना दिसतात तर दुसरीकडे हेच पोलीस कोरोना संकटाचा सामना निकराने करताना दिसतात. दिसणाऱ्या शत्रूवर आपण तुटून पडतो पण आज पण न दिसणाऱ्या कोरोनासारख्या शत्रुशीही पोलीस जिवाची बाजी लावून लढताहेत, याबद्दल पोलीसांचे कौतुक करावे तेवढे थोडे आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.

हेही वाचा > भुजबळांची बिअर बारमध्ये धाड! बिल न देताच मद्यपींचा पोबारा; दिवसभर चर्चेला उधाण 

इच्छाशक्ती हा अत्यंत महत्वाचा गुण

प्रसंगावधानता हा अत्यंत महत्वाचा गुण पोलीसांच्या अंगी आवश्यक असतो. कधीकधी एखादी कारवाई केली तर का केली? म्हणून प्रश्न उपस्थित केले जातात तर नाही केली तरी का नाही केली? याद्दबद्दलही प्रश्न उपस्थित केले जातात, अशा वेळी ‘होश आणि जोश’ यांचे तारतम्य ठेवून निर्णय घ्यायचे असतात. माणसाची इच्छाशक्ती हा अत्यंत महत्वाचा गुण असतो आणि ही इच्छाशक्तीच आपली स्वप्न निश्चित करत असते. आज पोलीस अकादमीतून बाहेर पडणाऱ्या प्रशिक्षणार्थींनी पोलीस दलात जायचं स्वप्न पाहिलं आणि ते साकार केलं ही जीवनातली फार मोठी उपलब्धी आहे, अशी स्वप्न पहाययला मोठी दुर्दम्य इच्छाशक्ती लागते, ती पोलीस दलात येणाऱ्या प्रत्येकाच्या ठायी असते. भविष्यात तुमची स्वप्न ही केवळ तुमची स्वप्न नाहीत तर ती संपूर्ण महाराष्ट्राची स्वप्न आहेत. म्हणून हे सर्व प्रशिक्षणार्थी पोलीस उपनिरिक्षक जनतेच्या विश्वासाला सार्थ ठरवतील असा आशावादही यावेळी मुख्यमंत्री ठाकरे यांनी व्यक्त केला. 

हेही वाचा > दुसऱ्या लाटेत कोरोनाने बालकांना घेरले! हृदय, मेंदूवर आघात होत असल्याची बाब उघड

यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार दूरदृश्य प्रणालीद्वारे तर पोलीस महासंचालक, रजनीश शेठ, अपर पोलीस महासंचालक (प्रशिक्षण व खास पथके) संजयकुमार, नाशिक शहराचे पोलीस आयुक्त दीपक पांडेय, महाराष्ट्र पोलीस प्रबोधिनीच्या संचालक अश्र्वती दोरजे, नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक प्रताप दीघावकर, नाशिक ग्रामीणचे पोलीस अधिक्षक सचिन पाटील,  प्रभारी सहसंचालक तथा उप संचालक (प्रशिक्षण), गौरव सिंग, उपसंचालक (प्रशासन), शिरीष सरदेशपांडे उपसंचालक (सेवांतर्गत प्रशिक्षण), काकासाहेब डोळे, सहा.संचालक ( कवायत ) अभिजीत पाटील तसेच प्रबोधिनीमधील सर्व सहायक संचालक, वैद्यकीय अधिकारी विधी निदेशक, सहा कवायत निदेशक प्रत्यक्ष उपस्थित होते.