रेमडेसिव्‍हिरचा पुरवठा थेट कोविड रुग्‍णालयांना; जिल्‍हाधिकाऱ्यांनी अन्न व औषध प्रशासनाला दिल्‍या सूचना 

नाशिक : गेल्‍या काही दिवसांपासून जिल्ह्यात रेमडेसिव्‍हिर इंजेक्शनचा तुटवडा जाणवत असल्याने रुग्‍णांच्‍या नातेवाइकांची दमछाक सुरू होती. त्या मुळे जिल्‍हाधिकारी सूरज मांढरे यांनी शनिवारी (ता. १०) अन्न व औषध प्रशासन विभागाला रेमडेसिव्‍हिर इंजेक्‍शन उपलब्‍धतेबाबत आदेश जारी केले आहेत. त्यानुसार कोविड रुग्‍णालयांना आता थेट इंजेक्‍शनचा पुरवठा होणार असून, काळाबाजार रोखण्याच्‍या अनुषंगाने रुग्‍णालयांवर महत्त्वाची जबाबदारी असणार आहे. केवळ एक किंवा दोन पुरवठादारांकडूनच व्‍यक्‍तिगत पुरवठा केला जाणार आहे. 

जिल्‍हाधिकारी मांढरे यांनी आदेशात म्‍हटले आहे, की वैद्यकीय तज्‍ज्ञांच्या प्रोटोकॉलनुसार बाधित रुग्‍णास रेमडेसिव्‍हिर इंजेक्‍शन देणे गरजेचे असल्‍यास नेमके किती इंजेक्‍शन देण्याची गरज आहे, याबाबत खात्री न करता सरसकट सहा ते सात इंजेक्‍शन आणण्याची मागणी होत आहे. या मुळे रुग्‍णांचे नातेवाईक इंजेक्‍शन खरेदीसाठी मेडिकल, होलसेल दुकानांमध्ये गर्दी करत असून, भीतीचे वातावरण निर्माण होत आहे. त्‍यानुषंगाने आता रेमडेसिव्‍हिर इंजेक्‍शन नियुक्‍त केलेल्‍या होलसेलरमार्फत थेट कोविड रुग्‍णालयांना पुरवठा केला जाईल. व्‍यक्‍तिगत पुरवठा केवळ एक अथवा दोन पुरवठादारांकडून होईल. जिल्ह्यातील रुग्‍णालयांसाठी लागणारा साठा, शिल्‍लक साठा, तसेच मागणी याबाबत दैनंदिन अहवाल घेण्यासाठी एक जबाबदार अधिकारी नेमावा. तक्रारींच्‍या निराकरणासाठी भरारी पथक नेमण्यास सांगितले आहे. जिल्ह्यातील कोविड रुग्‍णालयांमध्ये औषधाचा अनियंत्रित वापर, अनाधिकृत साठा आणि गैरवापर होण्याचे निदर्शनास आल्‍यास तातडीने कारवाई करण्याबाबत भरारी पथकास कळविण्यास सांगितले आहे.  

हेही वाचा - अवघे गाव हळहळले; दोन दिवसांपूर्वीच्या लेकीच्या लग्नाच्या मांडवातूनच निघाली पित्याची अंत्ययात्रा  

रुग्‍णालयांना बॉटल जतन करावी लागणार 

संबंधित फार्मासिस्‍टनी रेमडेसिव्‍हिरची विक्री करताना इंजेक्‍शनच्‍या बॉटलवर रुग्‍णाचे नाव लिहिले जाते. संबंधित रुग्‍णालयाने हे इंजेक्‍शनच्‍या बॉटलचे जनत करावे. रुग्‍णालयाद्वारे इंजेक्‍शनचा योग्‍य वापर झाला आहे अथवा नाही, याची खातरजमा विभागामार्फत करण्याचे आदेशात नमूद केले आहे. कोरोना बाधितांकरीरिता इंजेक्‍शन वापरत असलेल्याचे प्रमाणपत्र, सोबत आधारकार्ड किंवा अन्‍य छायाचित्र असलेल्‍या पुराव्‍याची प्रत व अन्‍य आवश्‍यक कागदपत्रे जोडून एकूण मागणीपत्र पुरवठादाराकडे त्‍यांच्‍या प्रतिनिधीमार्फत पोच करण्याचे सूचविले आहे. 

हेही वाचा - लग्नाच्या तयारीला लागलेल्या वधू-वरांचा हिरमोड! विसंगत आदेशामुळे 'वेडिंग इंडस्ट्री'त गोंधळ